धरणगांव प्रतिनिधी : राजेंद्र वाघ
धरणगांव : दि. १३ मे २०२४ रोजी भारतातील चौथ्या टप्प्यातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया धरणगाव शहर व परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली. याबाबत धरणगाव शहरातील विविध बुथवर आमच्या प्रतिनिधींनी झालेल्या मतांची टक्केवारी संदर्भात बातमी घेण्याबाबत भेट दिली असता उपस्थित बीएलओ आणि कर्मचारी त्यांच्या कामात व्यस्त होते. यावेळी निवडणूक कार्य आटोपल्यानंतर बुथवर उपस्थित बीएलओ यांना मिळत असलेल्या मानधनाबाबत विचारणा केली असता त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सुर दिसून आला. यावेळी त्यांना विचारले असता निवडणूक प्रक्रियेत, निवडणूक कार्यात समन्वयाची आणि प्रत्यक्ष कामकाजात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ सुपरवायझर आणि सर्व कर्मचारी आम्ही राष्ट्रीय काम समजून अतिशय प्रामाणिकपणे दहा ते बारा दिवस काम केले, करीत असतो. ह्या कामाचे त्यांना केवळ १५० रुपये मानधन शासनाने देऊ केले याबद्दल तालुक्यातील व शहरातील बीएलओ यांचा नाराजीचा सूर दिसून आला.
निवडणुक काळात तालुकास्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून अनेक बैठकी झाल्यात आणि जवळजवळ दहा ते बारा दिवस वोटर स्लिप वाटण्याचे काम शहर व परिसरात प्रामाणिकपणे केले यानंतर दोन दिवस दि. १२ व १३ मे रोजी मतदान केंद्रावर आलेल्या समूहाचे स्वागत करून त्यांच्या व्यवस्थेपासून सर्वच कामे केली व मतप्रक्रिया आटोपल्यानंतर आलेला समूह जाईस्तोवर सर्व कामकाज बीएलओ यांनी सांभाळले. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून आम्ही स्थानिक मतदारांशी परिचित असतो आणि सामान्यतः त्याच मतदान क्षेत्रातील मतदार असतो जो त्याच्या स्थानिक ज्ञानाचा वापर करून यादी अद्ययावत करण्यात मदत करतो. खरं तर, बीएलओ हा भारतीय निवडणूक आयोगाचा तळागाळातील एक प्रतिनिधी आहे जो त्याला नियुक्त केलेल्या मतदान क्षेत्राशी संबंधित कार्य आणि प्रत्यक्ष त्या मतदार भागात माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेत निरंतर महत्त्वाची भूमिका बजावतो. तरी देखील शासनाकडून केवळ मात्र १५० रुपये मानधन मिळाले या मानधनाने एकंदरीत बीएलओ नाराज दिसून आले. तालुक्यातील सर्व बीएलओ आपली व्यथा निवडणूक निर्णय अधिकारी, धरणगांव तसेच मा.जिल्हाधिकारी जळगांव यांना कळविणार आहेत व मा जिल्हाधिकारी यांनी योग्य कामाचा योग्य मोबदला द्यावा अशी विनंती बीएलओ यांच्यामार्फत केली जाणार आहे. काही वेळा मतदान अधिकाऱ्यांना अनेक अडचणी येतात. मतदान अधिकाऱ्यांना वेळोवेळी बीएलओ यांनीच त्यांना मदत केली. मतदान अधिकारी यांना आरोग्य व्यवस्था, भोजन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था अश्या अनेक व्यवस्था बीएलओ यांनी करून दिल्या आणि मानधन देणेबाबत शासनाने कसूर का करावा ? असा प्रश्न सर्वच बीएलओ यांच्या मनात आहे. याउलट एका स्वयंसेवकाला १५० रुपये एका दिवसाचे व बीएलओ यांनी सरासरी दहा दिवस काम करून देखील त्यांना १५० रुपये असा फरक शासनाने का करावा हा देखील प्रश्न बीएलओ मनात आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी यासंदर्भात विचार विनिमय करून लवकरच तालुक्यातील बीएलओ यांना नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा आहे.