Home चंद्रपूर जीवनमुल्यांवर आधारित शिक्षण म्हणजे आयुष्यभर पुरणारी शिदोरी-माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे

जीवनमुल्यांवर आधारित शिक्षण म्हणजे आयुष्यभर पुरणारी शिदोरी-माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे

204

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986 ब्रम्हपुरी -शालेय पाठ्यपुस्तकांमधुन न मिळणारे जीवनमुल्यांवर आधारित अनेक अभ्यासक्रम या शिबिरात शिकविले जात असुन इथल्या दिनचर्येच्या व विविध सत्रांच्या माध्यम्यातून मिळणारी शिस्त व संस्काराची शिदोरी ही शिबिरार्थिंना आयुष्यभर पुरणारी असल्याचे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी अड्याळ टेकडी येथे सुरु असलेल्या जीवन शिक्षण शिबिर प्रसंगी केले.
भु – वैकुंठ समिती , आत्मानुसंधान अड्याळ टेकडी द्वारा ५ मे पासुन सुरु झालेल्या जीवन शिक्षण शिबिर अभ्यासक्रमात संजय गजपुरे यांनी उपस्थित राहुन शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. २० मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातून २२५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत . पंधरा दिवसाच्या या शिबिरात ग्रामगीतेच्या अध्यनासोबतच ध्यान प्रार्थना , भजन भाषण , दैनंदिन संस्कार , श्रमदान , आहारशास्त्र , निसर्गोपचार , योग प्राणायाम , व्यायाम , लाठीकाठी , कराटे , बासरी , विविध संगित वाद्य यांसह स्वसंरक्षणाचे धडे यांचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. २० मे ला या शिबिराचा जाहिर समारोप होणार आहे.
या शिबिराचे संयोजक सुबोधदादा यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातुन सामुदायिक प्रार्थनेचे महत्व विषद करीत यातून देश व गाव घडविणारी सुसंस्कारित पिढी निर्माणाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी सांगितले . याप्रसंगी उपस्थित गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. किरणताई संजय गजपुरे यांनी या शिबिरातुन मानवतेचा विचार करणारी पिढी निर्माण होत असुन आपले गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प सर्व शिबिरार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भु – वैकुंठ समिती , आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे अध्यक्ष डॅा. श्री नवलाजी मुळे यांनी केले तर आभार कार्याध्यक्षा सुश्री रेखाताई यांनी मानले. सामुदायिक प्रार्थना व वंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here