बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी लोणार विवर एका अशनीच्या पृथ्वीवर आदळल्याने तयार झाले आहे. प्रत्येक वर्षी पंधरा हजार टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखाच एखादाच होतो. उल्का जेंव्हा पृथ्वीवर आदळते तेंव्हा त्याला अशनी म्हणतात. सुमारे ५२००० वर्षांपूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १० हजार टन अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला . ह्या धडकण्याने जवळपास ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगाटन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञांचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वीसुद्धा आपल्या व्यासात हलली असेल असं काही शास्त्रज्ञ सांगतात. इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे २.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच विवर तयार झालं. या विवराचं म्हणजेच सरोवराचं पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला आणि उल्का आणि अशनी मधील फरक अनुभवायला जगभरातील लोक लोणार सरोवराला भेट देतात. आज मात्र याच जगप्रसिद्ध लोणार सरोवरची प्रदूषणाने दुर्दशा झाली आहे. या सरोवरालाही प्लास्टिकने घेतले आहे. प्लास्टिकमुळे हा जागतिक वारसा धोक्यात आला आहे. पुणे आणि मुंबई येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनात या सरोवरात १६ प्रकारचे वेगवेगळे प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबईतील महाराष्ट्र कॉलेज यांनी केलेल्या संयुक्त संशोधनात हे आढळून आहे. अत्यंत दुर्मिळ शैवाल तसेच जिवाणूंचे या सरोवरात हजारो वर्षापासून अस्तित्व आहे मात्र प्लास्टिकमुळे त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांमुळे सरोवराचे सौंदर्य, संरचना आणि तेथील पर्यटनही धोक्यात आले आहे. लोणार सरोवरात असलेल्या सीता न्हाणी कुंडात स्नानासाठी कायम गर्दी असते. प्लास्टिकच्या कॅरिबॅगा लोक परिसरात फेकून देतात. याच बॅग उडून सरोवरात जातात. त्यामुळे सरोवरची अतिप्राचीन जीवसृष्टी आणि जैव रासायनिक प्रक्रियेलाच धोका निर्माण झाला आहे. लोणार सरोवराला पडलेला हा प्लास्टिकचा विळखा सोडवायला हवा. त्यासाठी लोणार सरोवर परिसरात प्लास्टिकवर बंदी घालायला हवी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५