✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. 9 मे) उमरखेड ते ढाणकी या रस्त्याचे कामाची सुरुवात अतिशय झपाट्याने झाली परंतु काही कालावधीतच कासवगती पेक्षाही संथगती तसेच उड्डाण पुलाजवळून ते विडूळ पर्यंत अर्ध्या रस्त्यावर गिट्टी डांबर टाकलेले असून रस्त्याच्या कडेला मोठमोठाले दगड टाकलेले असल्याने गो सी गावंडे महाविद्यालय ते झाडगाव (उजाड) दरम्यान आज दुपारी अंदाजे 3 वाजताचे दरम्यान कार आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला.
या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेले आहे.
उमरखेड ते ढाणकी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले असून या रस्त्यावर प्रवास करीत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तसा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावयास पाहिजे होते परंतु गती घेतलेल्या कामाने कासव गती पेक्षाही धिमी गती का? असा प्रश्न येथे निर्माण होतो.
रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून जवळपास दोन वर्षाहून अधिक कालावधीपासून बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्यामध्ये या रस्त्याने होणारे संभाव्य धोके सुद्धा विशद करण्यात आले होते तरीसुद्धा निर्ढावलेल्या प्रशासनास जाग येत नव्हती, अशातच सदर रस्त्याचे कामाची भूमिपूजन होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नाली बांधकामाचे काम सुरू झाले आणि प्रवाशांना वाटले की आता लवकरच हा रस्ता प्रवासाकरिता दुरुस्ती केल्या जाईल परंतु तसे घडले नाही आता कधी ह्या रस्त्याचे काम पूर्ण होणार कारण पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे.
पावसाळ्यामध्ये या रस्त्याने अजून किती अपघात घडतील याचा विचार केला तरी मन सुन्न होतं. आज घडलेल्या अपघातास कारणीभूत असलेले संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत.
आता तरी संबंधित विभाग सदर रस्त्याचे कामास गती देईल का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.