Home लेख परतफेड…..!!

परतफेड…..!!

132

 

कॉलेजला असताना म्हणजे कॉलेजच्या शेवटच्या दिवसात मित्रांकडून एक स्लॅम बुक लिहून घेतल्या जायचे, ज्यात मैत्री म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? असे अनेक प्रश्न असायचे. ज्याचे उत्तर आपल्या वयानुसार, ज्ञानानुसार, अनुभवानुसार दिले जायचे. पण त्यातला जीवन म्हणजे काय? हा जो प्रश्न होता त्याला आपले अनुभव कमी पडायचे. तरीसुद्धा अनुभव काहीही असो प्रत्येकाच्या हिशोबाने उत्तर दिले जायचे. ज्यात कोणी म्हणायचे ‘जीवन म्हणजे जन्म व मरणाचा प्रवास’; ‘जीवन म्हणजे दोन घडींचा डाव’; ‘जीवन म्हणजे एक संघर्ष ’, वैगरे बरेच अर्थ ज्याच्या त्याच्या परीने काढले जायचे. जीवनाची व्याख्या कळायला व ते समजायला प्रत्येकाला जगण्याचा विशिष टप्पा पार करावा लागतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन कळते. मला आज जे काही माझ्या अनुभवाने कळाले ते मी मांडणार आहे. जीवनाचा मीही एक अर्थ काढला आहे. तो मी सांगणार आहे. माझ्या मते, जीवन म्हणजे एक ‘परतफेड’ होय. ज्यामध्ये जगताना प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर परतफेड करावी लागते. कधी घ्यावे लागते तर कधी द्यावे लागते. माणसे बदलतात, नाती बदलतात पण ‘ परतफेड ’ कायम राहते. चला तर ती परतफेड काय आहे हे आपण समजून घेवुया..
भारतीय विवाह परंपरेत ‘मूळ’ देण्याची एक पद्धत आहे. कोणीतरी सुरुवातीला दुसऱ्याला मूळ देतो. मग त्याने आपल्याला मूळ दिले होते म्हणून हा पण देतो. कधी कधी अशाच लग्नसमारंभात अनेक पाहुण्यांच्या घोळक्यात एखादा गटात न बसणारा पाहुणा दिसतो, याचा अर्थ अगोदर त्या गटात न बसणाऱ्याने या बसणाऱ्याला त्याच्या गटात कधीतरी बोलवलेले असते. ही झालेली सळमिसळ केवळ परतफेड करण्यासाठीच होती. आपल्याकडचे लोकं विनाकारण कोणाला चहा पाजत नाहीत किंवा विनाकारण कोणाला जेवायलाही नेत नाहीत. तसे करण्यासाठी पण एक अट असते ती म्हणजे परतफेडीची. त्याने आपल्याला दिले होते म्हणून आपण पण देवू. नाही काही दिले तर काहीच नाही द्यायचे. यामध्ये बरेच महाभाग असेही असतात, समोरच्याने कधी आपल्याला काय दिले होते? किती वेळा दिले होते? हे बरोबर ध्यानात ठेवतात आणि बरोबरीने परतफेडही करतात. कधीही स्वतः कडून जास्त जावू देत नाहीत. चुकून जर पुढच्याकडून अधिक प्राप्त झाले तर झाले. वाढदिवसाला शुभेच्छाही तोलून मापून दिल्या जातात. एवढेच काय तर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे व्हॉट्सॲप स्टेटसही परतफेडीसाठीच ठेवतात. परतफेड करायची म्हणून करतात. गिफ्ट द्यायचे असेल तर त्याने दिले म्हणून द्यायचे, नाही दिले तर नाही द्यायचे. पुढच्याचे गिफ्ट ज्या किमतीचे होते त्याच किमतीचे द्यायचे. लग्नसमारंभातही हाच नियम पाळला जातो. त्यांचा आहेर भारीचा तर आपला पण! त्यांचा हलका तर आपण पण हलकाचा देवू. मग आपली हैसियत काही का असेना.
आई -वडील मुलांना जन्म घालतात. त्यांना शिकवतात. स्वत:च्या पायावर उभे करून मोठे करतात. मग मुलांची पाळी असते आई वडिलांना सांभाळायची. ही एक पूर्वापार चालत आलेली परतफेड होय. ज्याला आपण कर्तव्य म्हणतो. यामध्ये कधी कधी परतफेडीचे नियम बरोबर पाळले जातात. म्हणजे जे मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत, त्यांची मुलं पुढे त्यांना सांभाळायला कर्तव्य समजत नाहीत. कारण ती जे पाहतात तशीच ती वागतात, तसे ती समजतात.
एकमेकांना मदत करणे हा देखील एक परतफेडीचाच भाग आहे. संकटकाळी केलेली मदत आपण ध्यानात ठेवतो आणि पुढच्या व्यक्तीला वेळ आली तेव्हा आपण नक्कीच धावून जातो. कारण आपल्याला केलेली मदत आपण कधी विसरत नाही. ती विसरायची पण नसते. जो विसरतो तो कृतघ्नच असतो.
परतफेडीच्या बाबतीत लोकं जाणीवपूर्वक काही गोष्टी विसरतात. जसे ज्ञान घ्यावे तसे द्यावे. पण बरेच जण असे करताना दिसत नाहीत. कारण त्यांना आपल्यापेक्षा कोणीतरी सज्ञान व्हावे असे वाटत नाही. एखाद्याला एखादी गोष्ट कोणाच्या आधी समजली तर ती दुसऱ्यांना लवकर समजू नये म्हणून स्वतः कडून न कळविण्याची पुरेपूर काळजी घेतल्या जाते. म्हणजे ज्ञान देण्याला आपण परतफेड समजतच नाही. दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी ज्याने आपल्याला काहीतरी दिले तर परतफेड त्यालाच करावी? का? कधी आपण होवून दुसऱ्याला मदत करून स्वतः पासून सुरुवात केलेली वाईट आहे का? कारण एखाद्याच्या परतफेडसाठी त्या वेळेची वाट पाहणे यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला देणे महत्वाचे नाही का? परतफेड ही आत्मसंतुष्टीसाठी आपण करतो. ते एक प्रकारचे समाधान आहे. म्हणजे माझे आता कोणाला काही देणे नाही. पण हीच आत्मसंतुष्टी स्वतःपासून सुरुवात केली तरी चालू शकते. त्यासाठी आपल्यापैकीच कोणीतरी चांगल्या कामाची सुरुवात करावी लागेल आणि ती व्यक्ती आपण स्वतः होत असू तर चांगलेच. जर असे नाही केले तर परतफेड नावाची ही प्रक्रिया कशी सुरू होईल. प्रत्येकवेळी पुढच्याने जे दिले तितकीचे तोलून मापून परतफेड करणे हे पण योग्य नाही. कधी जास्त तर कधी कमी पण होवू शकते. त्या वेळची गरज काय? हे महत्वाचे आहे. हा विचार दोन्हीकडच्या व्यक्तींनीही तितकाच विचार करून करायला हवा.
बऱ्याच वेळा आपल्याला जे दिलेले आहे ते असून दिसत नाही. याचा अर्थ आपण परतफेड करायची नाही असा होत नाही. जसे निसर्ग आपल्याला खूप काही देतो. मग या निसर्गाच्या निकोप वाढीसाठी आपण झाडे लावणे, प्रदूषण कमी करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही परतफेड करायला काय हरकत आहे. एखादे विद्यमान सरकार आपल्या गरजा पूर्ण करत नसेल तर त्यांना त्यांची जागा मतदान करून दाखवणे ही एक परतफेडच आहे. म्हणजे ज्या गोष्टी अदृश्य असतात त्या नसतात असे नव्हे. तो शोध आपल्याला घेता आला पाहिजे आणि वेळ साधून परतफेडही करता आली पाहिजे.
नातेसंबंधात परतफेड खूप महत्वाची आहे. यामध्ये सुखावणे कमी दुखावणेच जास्त असते. दुखावण्यामागचे कारण इतकेच, की आपण समोरच्याकडून अपेक्षा जास्त ठेवतो आणि स्वतः ची द्यायची वेळ आली की आपले कर्तव्य नाही किंवा आपण बांधील नाही म्हणून मागे हटतो. त्यावेळस आपण समोरच्याचा विचार एक माणूस म्हणून करायला हवा. नेहमी जावयाला सासरच्यांनी काही न काही द्यायचे आणि जावयाची द्यायची वेळ आली की आपण बांधील नाही म्हणून मागे सरायचे. हे काही बरोबर नाही. भावाने बहिणीचे रक्षण करायचे हे पूर्वापार आपण ऐकत आलोय. जी गोष्ट आपण मनेभावे पाळली सुद्धा. यात रक्षण म्हणजे काय? तर केवळ शत्रूपासून संरक्षणच नव्हे तर बहिणीला भावनिक आधार, आर्थिक हातभार लावणे म्हणजे तिचे येणाऱ्या संकटापासून रक्षणच होय की! मग असाच आधार भावालापण लागत असेल, नाही का? ज्या बहिणी हक्काच्या बाता करतात त्यावेळेस भाऊ म्हणून त्याचा देखील बहिणीवर तितकाच अधिकार असायला हवा. जर ती मदत करण्यास स्वत:च सक्षम नसेल तर आपण ते समजू शकतो. पण सगळे व्यवस्थित असून वेळ आली तेव्हा तिचा आधार जर भावाला नसेल तर याला परतफेड नाही म्हणता येणार. नाती तेव्हाच टिकतील जेव्हा हा परतफेडीचा नियम पाळला जाईल. उगाच दुसऱ्यावर तोच नियम लादून नाही. एक मित्र भावापेक्षा जवळचा का वाटतो कारण त्या मैत्रीमध्ये परतफेड पुरेपूर पूर्ण केल्या जाते. कधी चुकले तर समायोजन पण साधले जाते.
निव्वळ खाणे – पिणे आणि दगदग म्हणून रोज पळणे केवळ यालाच जीवन नाही म्हणता येणार. या सर्व दुव्यांना जोडणारा दुवा ही खरी परतफेड असते. ज्याला हा दुवा कळतो आणि जो हा दुवा पक्का धागा म्हणून विणतो तोच खरे आयुष्य जगतो आणि इतरांना समजू शकतो.
सगळ्यात महत्वाचे, परतफेड म्हणजेच सर्व नाही. पण सर्व नसली तरी ती जीवनाचा अविभाज्य भाग नक्कीच आहे. ज्याला आपण टाळू शकत नाही; टाळू नाही.

जगण्याच्या नादात
जो नको त्याचा
वाद करतो
त्याला त्यातला स्वाद
कळत नाही
जो जगला इतरांसाठी
त्याएवढा कोणी
गुणी नाही…

लेखक – अमोल चंद्रशेखर भारती, नांदेड
मो – 8806721206

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here