७ मे, भारत मातेचे महान सुपूत्र , चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोर – सांको येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शारदादेवी तर वडिलांचे नाव महर्षी देवेंद्रनाथ टागोर असे होते. रवींद्रनाथ टागोरांनी आपले शिक्षण घरीच विविध विषयांच्या खाजगी शिक्षकांच्या हाताखाली घेतले. त्यांनी लहान वयातच कविता लिहायला सुरुवात केली. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. बॅरिस्टर होण्याआधी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवी शिवाय ते बंगालमध्ये परतले. १४ नोव्हे १९१३ रोजी गीतांजली या रचनेबदद्ल स्वीडीश अकादमीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत. १९१५ साली त्यांना ब्रिटीश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे जगातील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रविंद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव असे संबोधले जाते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रविंद्रोत्तर अशी विभागणी केली जाते यावरून बंगाली साहित्यावर रवींद्रनाथांच्या प्रभाव लक्षात येतो. एक महान कवी असण्यासोबतच ते एक महान देशभक्त होते त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात मोठ्या संख्येने भारतीय लोकांना प्रभावित केले. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथ टागोर यांचे निधन झाले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५