चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला काजल ठवरे, गंगाधर गजभिये, सत्यफुलाबाई चव्हाण, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
याप्रसंगी आशिक रामटेके व अशीत बांबोडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण, स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे, जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारण, पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि शेती-उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले.शिक्षणाचे महत्व ओळखणारे देशातील पहिले राजे हे छत्रपती शाहू महाराज हेच होते. राज्यातील निरक्षर, गरीब, अस्पृश्य, दलित या बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल हे ओळखून त्यांनी समाजातील वंचित, दुर्लक्षित वर्गातील मुलांसाठी वसतिगृहे काढली. विविध जातीधर्मातील मुलांसाठी त्यांनी २२ वसतिगृहे स्थापली त्यात शेकडो मुले शिकली. शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी मुलींना ४० रुपये स्कॉलरशिप सुरू केली.ब्रिटिश सरकार शिक्षणावर वार्षिक ८० हजार रुपये खर्च करत असताना कोल्हापूर संस्थानचा शिक्षणावरील वार्षिक खर्च हा एक लाख रुपये इतका होता. यातच शाहू महाराज यांची शिक्षणाविषयी किती तळमळ होती हे दिसून येते.अशा शब्दात मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
याप्रसंगी अशोक मेश्राम, सागर बोरकर, भावना बहादुरे,सरिता गजभिये व गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले व आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.