_कलाकारांना धर्म नसतो असं म्हणतात. त्यांची कला हाच त्यांचा धर्म असतो, पण काही कलाकारांनी इतिहासात आपली अशी काही छाप सोडली आहे की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही आपल्या मनात कुतूहल निर्माण होतं आणि आपण त्याची माहिती शोधून काढतो. बापू- श्रीकृष्णदास निरंकारी यांचा सदर संकलित लेख अवश्यच आपल्या ज्ञानात भर घालेल… संपादक._
अकबराच्या दरबारातील रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तानसेन बद्दल अशीच एक चकित करणारी माहिती इतिहास अभ्यासकांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे. नावावरून आणि आजवर ऐकलेल्या कथांवरून तानसेन ही व्यक्ती मुस्लिम धर्मीय असावी, असा बहुतांश लोकांचा अंदाज आहे, पण आपल्या गायन कलेने आणि उर्दूच्या अस्खलित उच्चाराने अकबर राजा आणि दरबाराला प्रभावित करणारा हा गायक हिंदू धर्मात जन्माला आलेला होता, अशी माहिती एका इतिहास अभ्यासकाने लिहून ठेवलेली आहे. तानसेन हे एक श्रेष्ठ भारतीय गायक होत. संगीतक्षेत्रात अलौकिक अशा गणल्या गेलेल्या या कलावंताबद्दल जितके चमत्कार आणि दंतकथा प्रचलित आहेत, त्या मानाने त्याचे अधिकृत चरित्र असे कोठे नोंदले गेलेले नाही. त्याचे जन्मवर्ष १५०६, १५२६, किंवा १५३१–३२ असेही दर्शविले जाते. तानसेनचे मूळ नाव रामतनू किंवा तन्नामित्र असे होते. ग्वाल्हेरजवळ बेहट या गावी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील मकरंद पांडे हे गौड ब्राम्हण, संस्कृत पंडित व उत्तम गायक होते. त्यांच्यामुळे त्याला लहान वयातच गाण्याची गोडी लागली. तानसेनची ग्रहणशक्ती पाहून वृंदावनचे संत स्वामी हरिदास यांनी तानसेनला गाणे शिकवले. आरंभी ग्वाल्हेर येथे दरबारात राहिल्यावर आणि गायक म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केल्यावर तो रीवा नरेश, रामचंद्र बाघेला यांच्या दरबारांत गायक म्हणून राहिला. तेथून सन १५६२च्या सुमारास तानसेन अकबर बादशाहाच्या दरबारात आले. अकबरच्या दरबारात येण्यापूर्वीच सर्वोत्कृष्ट गायक म्हणून त्यांची ख्याती पसरलेली होती. अकबराने त्यांना विशेष सन्मान देऊन संगीतसम्राट तानसेन म्हणून गौरविले आणि आपल्या दरबारी नवरत्नांमध्ये त्यास स्थान दिले. पुढे तानसेन हे संगीतक्षेत्रातील एक अद्भूत चमत्कार म्हणून ख्याती पावले. तानसेन हे धृपद गायक होते. शिवाय त्यांनी स्वतः रचलेली अनेक धृपदेही प्रसिद्ध आहेत. रागकल्पद्रुम या ग्रंथात तानसेनने रचलेली अनेक धृपदे आढळतात. त्यांनी व्रज भाषेत आपली पद्यरचना केली.
तानसेनचा जन्म इ.स.१५३२मध्ये मध्यप्रदेश मधील बेहट, ग्वाल्हेर येथे एका ब्राम्हण घरात झाला होता. त्याचं खरं नाव रामतनू पांडे असं होतं. त्याच्या वडिलांचं नाव मुकुंदराम पांडे असं होतं. मुकुंदराम पांडे हे एक कवी आणि संगीतकार होते. काही काळ त्यांनी वाराणसीच्या मंदिरात प्रवचनकार म्हणून काम केलं होतं. तानसेनने गाण्याचं शिक्षण आपल्या वडिलांकडून घेतलं होतं. रामतनू हा मुकुंदराम पांडे यांचा एकुलता एक सुपुत्र होता. त्याच्या जन्माची एक कथा आहे. मुकुंद पांडे हे ग्वाल्हेरच्या मोहम्मद गाऊस यांच्या गायकीचे चाहते होते. व्यक्ती म्हणून देखील मुकुंदराम हे मोहम्मद गौस यांचा खूप आदर करायचे. एका भेटीत मुकुंदराम यांनी गौस यांना आपल्याला आपत्य नसल्याची खंत व्यक्त केली होती आणि अशी विनंती केली होती की, “आपणही आम्हाला मुलगा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.” मोहम्मद गौस यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि मुकुंदराम यांना मुलगा झाला. मुकुंदराम पांडे तो ५ वर्षांचा झाल्यावर आपल्या मुलाला मोहम्मद गौस यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन आले होते. भेटी दरम्यान, आपल्या मुलाने सुद्धा शास्त्रीय गायक व्हावं अशी इच्छा मुकुंदराम यांनी मोहम्मद गौसकडे व्यक्त केली. मोहम्मद गौस हे तेव्हा विड्याचं पान खात होते. शिष्य म्हणून नेमणूक करण्याच्या हेतूने मोहम्मद गौस यांनी आपल्या तोंडातील लाळ बोटाने काढली आणि ती त्यांनी रामतनू पांडेच्या तोंडामध्ये ठेवली. मोहम्मद गौस यांनी त्या दिवसापासून रामतनू पांडे याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांनी रामतनूचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला.
तानसेनला दोन बायका असून सुरतसेन, सरतसेन, सरस्वती ही हिंदू पत्नीची मुले आणि तानरंगखाँ व बिलासखाँ ही हुसेनी नामक मुस्लिम उपपत्नीची मुले असे समजले जाते. सरस्वतीचा विवाह मिश्रीसिंग (नौबतखाँ) नावाच्या बीनकाराबरोबर झाला आणि मुलीकडूनचा त्याचा बीनकारांचा वंश सेनिया म्हणून प्रसिद्धीस आला. मुलाकडूनची सेनिया परंपरा रामपूरची असून हे कलावंत धृपद गायक होते. तानसेनने स्वतः अनेक नवीन रागांची निर्मिती केली असून मियाँ की तोडी, मियाँ की मल्हार, दरबारी कानडा, मियाँ की सारंग वगैरे राग तानसेनची निर्मिती म्हणून मानली जाते. दीपक राग गाऊन अग्नी प्रज्वलित करणे, मल्हार गाऊन पाऊस पाडणे, तोडी गाऊन हरणे बोलावणे, बैजू बावराशी स्पर्धा, तानारिरिचा प्रसंग वगैरे अनेक चमत्कृतीपूर्ण आख्यायिका तानसेनच्या जीवनाशी जोडल्या जातात. सुप्रसिद्ध वैष्णव संत गोविंदस्वामी यांच्या बरोबरच्या आख्यायिकाही प्रचलित आहेत. संत सूरदास आणि पंडित जगन्नाथराम हेदेखील तानसेनच्या सहवासात आले होते, असे मानले जाते. संगीताच्या दृष्टीने तानसेनची धृपद गायकी ही गौडी, गोहरबानी म्हणून समजली जाते. संगीत सार व रागमाला हे दोन ग्रंथ त्याच्या नावांवर दाखवले जातात. अबुल फज्लने अकबरनाम्यात तानसेनाचे वर्णन “असा कलावंत हजार वर्षांत झाला नाही”, असे केले आहे. तानसेनाची समाधी ग्वाल्हेर येथे मुहंमद घौस या अवलियाच्या दर्ग्याजवळ दाखवली जाते. त्या ठिकाणी दर वर्षी तानसेनच्या पुण्यतिथीला मोठा जलसा भरवला जातो व त्यात अनेक नामवंत गायक आपली सेवा रुजू करतात.
पं.तानसेन ऊर्फ रामतनु ऊर्फ तन्नामित्र, त्रिलोचन, तनसुख हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होते. पं.तानसेन हे संगीतशास्त्रात निपुण होते. त्यांना मियां तानसेन असे सुद्धा म्हणत. पं.तानसेन यांच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे होते. त्यांच्याकडेच पं.तानसेन यांनी प्रारंभिक शिक्षण घेतले. सुफी संत गौस मोहंमद यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. संगीतसम्राट पं.तानसेन यांचे देहावसान दि.६ मे १५८९ रोजी झाले.
!! आज पं.तानसेन पुण्यस्मरण निमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !!
– संकलन व शब्दांकन –
बापू- श्रीकृष्णदास निरंकारी,
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.