मोर्शी तालुका प्रतिनिधी :-
१२ एप्रिल रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दापोरी येथील श्री संत लालदास बाबा यांच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने रक्तदाता संघ मोर्शी तथा श्री संत लालदास बाबा पुण्यतिथी उत्सव समितीच्या वतीने पार पडलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. या रक्तदान शिबिरात मनोरमाताई डोबने व विद्याताई नवघरे या महिलांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून अनेक वेळा अपघात झाल्यास रुग्णाला रक्ताची नितांत गरज भासते तसेच शस्त्रक्रिया करतांना रुग्णाला रक्त
मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी मोठी किंमत देऊन रक्त विकत आणावे लागते. जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिरे कमी होत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा होत आहे.
होत असलेल्या रक्त तुटवड्यामुळे रुग्णांना रक्त मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. अपघात घडल्यास वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यास रुग्णाला प्राणास मुकावे लागते ही गंभीर समस्या लक्षात घेऊन लालदास बाबा पुण्यतिथी उत्सव समिती दापोरी तथा रक्तदाता संघ मोर्शी तर्फे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराकरिता उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार व त्यांची अधिनस्त चमु तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील विभागीय रक्तपेढीची टीम रक्त संकलनासाठी उपस्थित होती.
श्री संत लालदासबाबा यांच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे संत लालदासबाबा संस्थानतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.