चिमूर:संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय आरटीई कायद्याशी विसंगत असून हजारो शिक्षकांना अतिरिक्त करणारा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे. विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला, क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे.हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी शिक्षक भारतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी यांचेमार्फत निवेदन दिले.
शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणारा शासन निर्णय हा केवळ शासन निर्णयांच्या संख्येत वाढ करणारा आहे. शिक्षकांना पेहराव कसा करावा हे समजते. वर्षानुवर्षे शिक्षक पेहरावासंदर्भातल्या सूचनांचे पालन करत आलेले आहेत. कोणी काय घालावे? हा व्यक्तीचा मूलभूत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. याबाबत शासनाने ढवळाढवळ करण्याची गरज नाही. तसेच केवळ नावापुढे TR किंवा टी लावून शिक्षकांना सन्मान मिळणार नाही. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मान द्यायचा असेल तर शिक्षण विभागातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासनाने शिक्षणसेवक आणि कंत्राटीकरण रद्द करून वेतन, पेन्शन, कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेत पी एफ आणि पेन्शन सुरू करावी.२००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन द्या, आश्वासित प्रगती योजना लागू करा, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा,शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारे संच मान्यतेचे निकष बदलावे,प्रत्येक शाळेत किमान शिक्षक संच निर्धारित करावा, संचमान्यतेमध्ये प्रत्येक विषयाला शिक्षक दिला पाहिजे,प्रत्येक विद्यार्थ्याला कला, क्रीडा,संगीत शिक्षक मिळाला पाहिजे आणि विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह भोजन मिळाले पाहिजे, शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नका या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे आणि सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे या दिनांक १५ मार्च २०२४ च्या दोन्ही अन्यायकारक शासननिर्णयाबाबत शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत. प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हे दोन्ही शासन निर्णय तात्काळ विनाविलंब रद्द करावेत यासंबंधी शिक्षक भारतीने निवेदन चिमूर पं.स.चे गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना दिले.
निवेदन देताना म.रा.प्रा. शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, चिमूर तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे, सचिव कैलास बोरकर,बंडू नन्नावरे,संजय सर,मिलिंद रामटेके आदी पदाधिकारी उपस्थित होते.