वंचित बहुजन आघडी आणि शिवसेना यांची युती झाली असे आपण वृतपत्रात वाचत आलो. वृतवाहिन्यावर बेकिंग न्यूज पाहत आलो.समाजात एक चांगला संदेश गेला. प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू एकत्र येऊन निवडणुका लढणार हा वैचारिक क्रांतिकारी बदल राज्यातील नागरिकांना मोठा धक्का देणारा ठरेल अशी स्वप्न पडायला लागली. महाविकास आघाडीत वंचित नसला तरी शिवसेने सोबत असेल असे अंदाज सर्वच जाणकार बांधायला लागले. पुढे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी वंचित समाजाचे नेतृत्व करणाऱ्या वंचित बहुजन आघडीला कशी स्वीकारेल ही मोठी समस्या होती. कारण या तिन्ही पक्षातील जात दांडगे धन दांडगे मराठे म्हणजेच रक्त पिणारे वाघ आहेत. ते वंचित समाजाच्या गरीब बैलांना आपल्या सत्तेच्या कुरणात घुसू देतील हे शक्य वाटत नव्हते.परंतु राजकारणात कधी ही काही होऊ शकते. शेवटी राजकारण असते. ते संधी वर मात करून करावे लागते. अशा वेळी बाबासाहेबांनी सांगितलेली एक तीन बैल एक वाघ यांची गोष्ट मला आठवली ती इथे वाचका समोर मांडतो.
1952 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊन केंद्रीय मंत्री मंडळालातून बाहेर पडले होते.तेव्हा निपाणी जिल्हा.बेळगाव कर्नाटक या ठिकाणी त्यांची एका दिवशी सभा होती त्या दिवशी दुपारी 3:00 वाजता बाबासाहेब आले.तिथे त्यांनी तीन बैलांमध्ये वाघाने कशी बेकी केली,ती गोष्ट पुढील प्रमाणे बाबासाहेबानी सांगितली होती.महाविकास आघाडी त्यातील सर्व घटक पक्ष आणि वंचित आघाडी यातील जागा वाटप करण्याच्या बैठकीत वंचितला मिळणारी वागणूक ही या वाघ व तीन बैलाच्या गोष्टीशी जुळणारी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भाषनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व जनसमूदायावर नजर टाकली,आणि धिरगंभीर आवाजात म्हणाले,”माझ्या बंधू आणि भगनीनो ! तुमच्या उद्धारासाठी मला ज्या ज्या मार्गाने व जे जे करता येणे शक्य होते,ते मी केले आहे.तुम्हास जे सांगावयाचे होते,ते मी सांगितले आहे.या पुढे तुम्हाला शिक्षण,संघटना व हक्कांसाठी सतत संघर्ष करावा लागणार आहे.” संघर्षाशिवाय तुम्हाला मागून न्याय मिळणार नाही.आपल्या पुढे अनेक संकटे उभी आहेत.त्यांच्याशी तुम्हाला संघटितपणे मुकाबला करावा लागणार आहे.अशा वेळी तुम्ही सर्व मागासवर्गीय जाती,जमातींनी संघटित झाले पाहिजे,तुमच्यात जर एकी झाली नाही,तर तीन बैलांच्या एकीत बेकी निर्माण करून,वाघाने त्यांचा कसा फडशा पाडला तशीच तुमची गत होईल.
एक फार मोठे कुरण होते.त्यात तीन बैल नेहमी चरावयास येत असत.ते एकमेकांचे फारच जीवलग मित्र होते.ते नेहमी एकत्र रहात,एकत्र गवत खात.एकमेकांवर प्रेम करीत.एक विचाराने वागत.एकमेकांना मदत करीत.सारी कामे एकत्र राहून एका मनाने करीत.ते बैल खूप सशक्त होते.ते खूप सुखी होते.चांगले लट्ट पोसलेले होते.एका वाघाने त्यांना पाहिले.त्याच्या तोंडाला पाणी सुटले.यातला एक तरी बैल आपण खावा. असे त्याच्या मनात आले.वाघ होता खूप बलवान.शिकारी करून खाणे हे त्याचे रोजचे काम. परंतु बैलांना मारून खाणे काही केल्या जमेना.कारण ते संघटितपणे रहात होते.वाघाने त्यांना मारण्यासाठी खूप प्रयत्न केला.परंतु ते तिघे एकत्रच असत.एकत्र चालून येत.तिघेही एकत्र शिंगे रोखीत आणि वाघाला ‘आमच्या पुढे येऊन तर पहा’ असे म्हणत.बैलांची शिंगे टोकदार होती.त्याच्या अंगात शक्ती होती.वाघाला त्यांना मारण्यासाठी हिम्मत होत नव्हती.वाघ बैलांना मारण्यासाठी रात्रंदिवस विचार करीत होता.त्याला झोप लागत नव्हती.अखेर त्याने खूप विचार केला.मनात काही बेत ठरविला.तो रानात दुसरीकडे गेला.तेथे इतर पशूना भेटला.तेथे त्या सगळ्यांशी बोलला.फक्त त्या बैलांबाबत बोलला.खोटे नाटे बोलला.चुगलीची सर्वाना गोडी असते.बहुतेकांना वाईट करणे आवडते. तेच तेच पुन्हा बोलणे आवडते.साऱ्या पशुनी तेच केले.तेही आपापसात बोलू लागले.बैलांची निंदा करू लागले.त्या बैलांच्या कुरणात गेले.एकेका बैलाला अलग अलग बोलावून त्यांच्यात बेकी कशी होईल.अशा प्रकारे सांगू लागले.त्याचा वाईट परिणाम झाला.त्यांचं एकमेका वरील प्रेम,विश्वास उडाला.त्यांना एकमेकांचा संशय वाटू लागला.ते एकमेकांचे शत्रू झाले.एकीमध्ये बेकी झाली.स्नेह होता तोही संपला.ते एक एकटे राहू लागल,फिरू लागले,एकमेकांशी बोलणे सोडून दिले.तीन बाजूनी तीन गेले.वाघाला तीन बैलांमध्ये बेकी हवीच होती.तो पुन्हा कुरणात आला.एक एकाशी अलग अलग लढला. त्याने एकेकाचा पराभव केला.त्यांचा प्राण घेतला. त्याना खाऊन टाकले. अशा तर्हेने त्याने तीन बैल फस्त केले.यातून आपण काय बोध घेणार आहोत.
तीन बैलांची एकी होती,तो पर्यत वाघ बैलांच्या वाटेला जाऊ शकत नव्हता.परंतु त्यांच्या मध्ये बेकी करून त्याने बैलांचा प्राण घेतला.आणि त्यांना खाऊन टाकले.त्याच प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेतील कार्यकर्त्या मध्ये फूट पाडून आपल्या पक्षात घेऊन जाणारे काही राजकीय पक्ष आणि इतर काही संघटना या भारत देशात आहेत.बैलांना बुद्धी नव्हती.म्हणून त्यांच्यात वाघाने बेकी केली.परंतु आम्ही भगवान बुद्धाला मानणारे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पूज्य मानणारे लोक,बैला सारखी बेकी करतो. आणि आपला नाश करून घेतो.मग बैलात आणि आमच्यात काय फरक आहे?.बैलानी बेकी केली नसती,तर त्यांचा प्राण गेला नसता.आम्ही जर मजबूत असलो तर जगातील कोणतीही शक्ती आमच्यात बेकी करणार नाही. बेकी झाली नाही आणि एकी असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे भारताचाच नव्हे, तर जगाचा उद्धार करू शकतो. परंतु आम्ही कमजोर आहोत.स्वार्थी आहोत. म्हणून आम्ही बेकीने राहतो. आमच्या बेकीचा फायदा इतर लोक घेतात.राजसत्ता मिळवितात आणि मजा करतात. बेकीमुळे बैलांचा नाश झाला. तसा आमचाही होत आहे.म्हणून एकीने रहा.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मतदार संख्या आणि टक्केवारी अनेकांना धडकी भरणारी आहे.गेल्या वर्षभरात राज्यात वंचितच्या जाहीर सभा दखल पात्र ठरल्या आहेत. शिवसेने सोबत झालेली युती आणि आजची परिस्थिति चिंताजनक आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीत वंचित कुठे असेल हे सांगता येत नाही.पण बहुजन समाजातील एकजुटीला वैचारिक गोंधळ,गैरसमज निर्माण करण्यास यशस्वी होतांना दिसत आहे.परंतु आम्ही कमजोर आहोत.स्वार्थी आहोत.म्हणून आम्ही बेकीने राहतो. आमच्या बेकीचा फायदा इतर लोक घेतात.राजसत्ता मिळवितात आणि मजा करतात. बेकीमुळे बैलांचा नाश झाला. तसा आमचाही होत आहे. म्हणून एकीने रहा.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकीने मतदान करा.कुठल्याही अमिशाला बळी पडू नका. आपला खासदार निवडून येणार नाही ही मनातील भीती काढून टाका. आपली मतदार संख्या निवडणुकीत दाखवून द्या. मग आपलाच उमेदवार खासदार म्हणून निवडून येऊ शकतो. होऊ शकत नाही,शक्य नाही हे प्रथम मनातून काढून टाका.
सागर रामभाऊ तायडे,
भांडुप,मुंबई.
9920403859