✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा यवतमाळ प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. १४ मार्च)
गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप विविध कार्यक्रमांनी झाला.
दत्तक ग्राम नागेशवाडी येथे ७ ते १३ मार्च २०२४ दरम्यान हे शिबिर घेण्यात आले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेशवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन सुरेश पाटील होते.
प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रियंका राम जटाळे, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश महेशकर, प्रा. कदम सर, प्राथमिक आरोग्य केंद्र उमरखेडच्या समुपदेशक वैशाली धोंगडे उपस्थित होते.
रेड रिबन क्लब उमरखेडच्या समुपदेशक सौ. वैशाली धोंगडे व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांच्या मार्फत एड्स जनजागृती पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गावातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतीक्षा पावडे, बी.एस्सी द्वितीय वर्ष हिला पंधराशे रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक लावंण्या प्रशांत अनासाने हिला बाराशे रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक कु. वैष्णवी चंद्रवंशी, नागेशवाडी हिला सातशे रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गावातील प्रतिष्ठित नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी अनुभव कथनातून शिबिरात खूप काही शिकायला मिळाले, श्रम व सेवेचा संस्कार मिळाल्याचे सांगितले. निरोप समारंभाचे प्रास्ताविक सुनील कदम, सूत्रसंचालन स्नेहल दर्शनवाड व ऋतिका राहुलवाड यांनी केले तर आभार प्रगती वानखेडे हिने मानले.
प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत आनासाने, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना मिटके व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.