Home महाराष्ट्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र उभारला  -जेष्ठ साहित्यिक मा. सुनीलकुमार लवटे

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र उभारला  -जेष्ठ साहित्यिक मा. सुनीलकुमार लवटे

106

 

कराड : ( ) “स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे व नेतृत्वामुळे सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण झाला. आजच्या वर्तमानात यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा नैतिकता, सभ्यता, जीवनमूल्ये जपणारा महाराष्ट्र आपणास दिसतो. परंतु आज त्यांनी निर्माण केलेला आदर्श महाराष्ट्र पुन्हा विकसित करावा लागेल. चव्हाण साहेबांचे  देशाच्या उभारणीत खुप मोठे योगदान असून त्यांचा विकासाचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे”असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक मा. श्री. सुनीलकुमार लवटे  यांनी केले. ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंती निमित्ताने आयोजित श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या अनुक्रमे ‘संगम’ आणि ‘यशवंत’ या नियतकालिकांच्या संयुक्त प्रकाशन व व्याख्यान समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र : मागे वळून पाहताना ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार मा. डॉ. अशोकराव डुबल हे होते.
जेष्ठ साहित्यिक मा. श्री. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून विकासाची दिशा दिली. त्यांचे साहित्य आणि सांस्कृतिक वर्तुळाशी असलेले घनिष्ठ संबंध सवर्श्रुत आहेत. ते स्वत: राजकारणाच्या व्यस्ततेतून लेखन करत. त्यामुळे याच तळमळीतून त्यांनी घेतलेले काही निर्णय देशाच्या हिताचे ठरले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा नंदादीप कायम तेवत ठेवला पाहिजे. त्यांच्यासारखा माणूस जगात आता होणार नाही. यशवंतराव चव्हाण चव्हाण यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान खूपच मोठे आहे. तसेच महाविद्यालयीन नियतकालिके म्हणजे विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याचे हक्काचे व्यासपीठ असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यामुळे वाव मिळतो ही दोन्ही नियतकालिके शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारी आहेत. ‘संगम’ व ‘यशवंत’ या नियतकालिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे उजळ प्रतिबिंब पहावयास मिळते.”
कार्यक्रमाची सुरुवात स्व. यशवंतराव चव्हाण, सौ. वेणूताई चव्हाण आणि आदरणीय पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दोन्ही महाविद्यालयाच्या नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.
समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. (डॉ.) श्रीमती एस. आर. सरोदे म्हणाल्या की, “शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पी. डी. पाटील यांचा वसा आणि वारसा जोपासत दोन्ही महाविद्यालयांनी नावलौकिक प्राप्त केलेला  आहे. तसेच या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने संस्था सर्वोतोपरी मदत करत असते. नियतकालिक स्पर्धांमध्ये ही दोन्ही नियतकालिके कशी सरस ठरतील याविषयी संपादकांचा कटाक्ष असतो. महाविद्यालयाचे नियतकालिक म्हणजे महाविद्यालयाचा आरसा असतो. ”
‘संगम’ या नियतकालिकाचे संपादन प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले असून मुखपृष्ठ श्री.  गणेश मिसाळ यांने साकारले आहे. तर ‘यशवंत’ नियतकालिकाचे संपादन प्रा. डॉ. ए. टी. जाधव यांनी केले असून मुखपृष्ठ कु. श्रेया जाधव यांनी साकारले आहे.
या प्रकाशन समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री नसरुद्दीन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड), मा. श्री. अरुण पाटील( काका) (विश्वस्त व सदस्य, मा. श्री. जयंत पाटील(काका), मा. श्री. प्रकाश पाटील(बापू),ॲड. दादासाहेब पवार तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य मा. डॉ. एस. बी. केंगार, माजी प्राचार्य बी. एन. कालेकर आदी उपस्थित होते.
या समारंभात दोन्ही नियतकालिकांच्या संपादक मंडळाचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेणूताई चव्हाण कॉलेजमधील प्रा. नीलम देसाई, प्रा. अमरवेली पाटील, प्रा. जयसिंग ओहोळ यांचा विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स मधील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व विशेष काम केलेल्या प्राध्यापकांचा प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. अजित लोले, डॉ.किशोर जमदाने, डॉ. शिवाजी उबाळे, प्रा.सुनील जाधव, प्रा. गीता बुरुड, प्रा. गिरीश पोतदार, प्रा. अविनाश राऊत, डॉ, सुषमा कीर्तने, डॉ. उदय लाड, डॉ. सचिन ओतारी, डॉ. विशाल पाटील, डॉ. राहुल जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दोन्ही नियतकालिकातील संपादकीय मंडळ दोन्ही नियतकालिकांचे मुखपृष्ठ तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्रा. डॉ. जे. यू. दीक्षित यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला. ‘संगम’ नियतकालिकाचे कार्यकारी संपादक प्रा. संतोष बोंगाळे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले तर ‘यशवंत’ नियतकालिकाचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. ए. टी. जाधव यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.  यावेळी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे प्रा. के. एस. जगधने यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रा सौ. एस. पी. पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास वेणूताई चव्हाण कॉलेज व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक  बहुसंख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here