ढानकी प्रतिनिधी, राजेश घुगरे
मो.9637684021
करंजी फाट्यापासून करंजी गावापर्यंत बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर रस्त्याचे काम होत आहे. एवढे दिवस दगड धोंड्याच्या ठेचा लागलेले गावकरी रस्त्याचे काम होत आहे म्हणून आनंदात असताना, सदर रस्ता मात्र गावकऱ्यांच्या किती दिवस सेवेत येईल ? हे सांगणे कठीण आहे. कारण सदर रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, सदर रस्त्याच्या कामात मांजरा खडक वापरत असल्याची चर्चा स्थानिक नागरिक कुजबुज करीत आहेत. त्यामुळे सदर रस्ता मजबुत व टिकाऊ होईल का ? असा प्रश्न निर्माण होतो.
:::::::::::::::::::::::::
*करंजीत होणाऱ्या नालीच्या कामाला वाली कोण ?*
करंजी गावात नालीचे सुद्धा काम सुरू असून, सदर नाली कोणत्या निधीतून, कोणत्या विभागामार्फत बांधकाम होत आहे, याची माहिती विद्यमान ग्रामसेवकाला विचारली असता ते मला माहित नाही. मला विश्वासात न घेता काम सुरू असल्याचे उत्तर ग्रामसेवकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले.
सदर रस्ता सुद्धा कोणत्या निधीतून मंजूर असल्याची माहिती विचारली असता, प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली.
यावरून लक्षात येते की, करंजी येथे सुरू असलेले काम रस्त्याचे असो वा नालीचे या कामाला वाली कोण ? या कामाचे कंत्राट नेमके कुणाला दिलेले असावे ? असे प्रश्न निर्माण होत असून, यामध्ये मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याची सुद्धा चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.
याकडे वरिष्ठ प्रशासन व शासन गांभीर्याने लक्ष देऊन, सदर काम हे गुणवत्ता पूर्ण कसे होईल ? याकडे लक्ष देणार का ? असा सवाल नागरिक करत आहेत.