Home महाराष्ट्र मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख...

मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार

85

‘ मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्र्य व गरिबीतली सुख समृद्धी होती ‘ असे भावोद्गार ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ या असंख्य पुरस्कृत आत्मकथनाचे लेखक,चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव) यांनी मुलाखतीत सुसंवाद करतांना काढले.
चोपडा येथील नगर वाचन मंदिराच्या अमरचंद सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेची चोपडा शाखा व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी राजू बाविस्कर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला.म.सा.प.चे प्रमुख कार्यवाह तथा सुप्रसिद्ध मुलाखतकार संजय बारी व व्रतस्थ वाचक प्रशांत गुरव यांनी यांनी मुलाखत घेत सुसंवाद साधला.विचारमंचावर म.सा.प.चोपडा शाखाध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे,कार्याध्यक्ष विलास पाटील, डॉ.विकास हरताळकर,माधुरी मयूर,श्रीकांत नेवे,रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटिया उपस्थित होते. प्रारंभी समस्त मान्यवरांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण केले.बाविस्कर यांच्या मानपत्राचे लेखन संजय बारी यांनी तर वाचन पंकज शिंदे यांनी केले.मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त तालुक्यातील साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
—————————————-
*चांगली माणसे मिळाल्याने आयुष्याचे भले*:
चोपडा तालुक्यातील लासूर येथील मूळ रहिवासी राजू बाविस्कर मुलाखतीत प्रश्नोत्तरात पुढे म्हणाले,’ शिक्षणामुळे माझं जगणं मला रंग – रेषा व शब्दात पकडता आलं.चांगल्या हितचिंतकांची बेरीज मातापित्यांच्या संस्कारामुळे करता आली त्याचाच परिपाक म्हणजे आजचे माझे यशस्वी कृतार्थ कलाजीवन आहे.हातात रद्दी पडण्यापेक्षा कै.कवी नीळकंठ महाजन व कवी अशोक कोतवाल यांसारख्या मान्यवरांमुळे वाचनाला दिशा मिळून प्रगतीचा यशोमार्ग सुकर झाला.आजूबाजूचा परिसर व सहवासातील मार्गदर्शकांचे अनमोल विचारांनी अंतःकरणात मुरून आकार घेतला त्यातूनच अभिव्यक्तीचा पोत व दर्जा बहरला.शेगाव येथील चित्र प्रदर्शनावेळी युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांनी माझ्या चित्रातील वेदनेची लिपी वाचून मला बोलतं केलं आणि माझ्यातील लेखक जागृत करून मला आत्मवृत्त लेखनास प्रेरीत केलं.तत्पूर्वी लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी चित्रकले संदर्भात स्तंभलेखन हक्काने लोकमत दैनिकसाठी लिहून घेतले होते.जळगावला मला पितृतुल्य अशोकभाऊ जैन, दिग्गज साहित्यिक स्वर्गीय ना.धो.महानोर ,भालचंद्रजी नेमाडे चित्रतपस्वी रवी आर्ट,कमर्शियल आर्टिस्ट जयंत पाटील,रंगकर्मी शंभू अण्णा पाटील व हर्षल पाटील ही चांगली माणसे मिळाल्याने आयुष्याचे भले झाले.
—————————————-
*कलाभिव्यक्तीची मुळं सर्वाथाने चित्रकलेतच*
संजय बारी यांनी प्रश्नोत्तरातून बाविस्कर यांच्या कलेचा पाया कसा घातला गेला या संदर्भात बोलते केल्यावर बाविस्कर यांनी विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगितल्या.राजू बाविस्कर म्हणाले की ,’ विजय लुल्हे व राजू महाजन या मित्रांच्या मार्गदर्शन व सहवासामुळे कला जाणीव वाढल्या.विजय लुल्हे याने चक्क घरून दप्तर घेऊन माझ्या कामावर येऊन हातातील काम अधिकाराने बंद करून मला शाळेत पोहोचवून देत असे.विजू मुळेच दहावी पासची सीमा पार करता आली आणि कलाशिक्षक होता आले.विद्यार्थीदशेत सातवीत असतांना दिवाळीच्या सुट्टीत जळगावला चित्रतपस्वी रवी पेंटर यांच्याकडे कलेतील अनौपचारिक शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी ही विजूने मला उपलब्ध करून दिली होती.विजूच्या अवतार चित्रपटातील सुपरस्टार राजेशखन्ना व गजब चित्रपटातील विजू व राजूने रेखाटलेली अभिनेत्री रेखा लासूरच्या कलारसिक अलमगीरने पानटपरीवर लावल्याने मी प्रेरीत झालो.विद्यार्थी दशेत कलासाधनेची तहान व निरंतर धावण्याची ताकद मला विजू व राजूने दिल्याने कलेचा पाया पक्का झाला.सुटीत मी सराव केला व स्मिता पाटीलचे चित्र रेखाटले ते अलमगीरला आवडल्याने त्याने टपरीत लावले.आजही चैतन्य देणारी अलमगीरी आर्ट गॅलरी मला जहाँगीर आर्ट गॅलरीपेक्षा अनमोल वाटते ! पुढे कलाशिक्षणाने व निरीक्षणांती कलाजाणीवा समृद्ध होऊन दीनदलीत व उपेक्षित समाजाच्या वेदना शब्दातून अर्थवाही झाल्या ; रेषा आशयघन होऊन बिनचेहऱ्यांच्या प्रतिकांन्वये माझी सृजनशील चित्रकार म्हणून स्वतंत्र ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली.अंतिमतः माझ्या कलाभिव्यक्तीची मुळं सर्वार्थाने चित्रकलेतचं आहेत ! ‘ बाविस्करांची चित्रशैली,रंगलेपन पद्धती,वास्तववादी रेखाटने यातील कलाकौशल्ये बारी यांनी सुसंवादातून अधोरेखित केली.
*आत्मवृत्तातील सुखदुःख मिश्रीत अविस्मरणीय घटना*:- आईला मूलबाळ होत नसे म्हणून माझ्या आईने स्वतः दुसरी बाई पाहून वडिलांचे दुसरे लग्न लावून दिले.आईचा संसारातील अनोखा त्याग व समर्पण सांगितले.माझ्या जन्मानंतर तिच्या दुधात खोट आहे ; मी वाचेल की नाही या भितीपोटी एका वडर समाजाच्या मावशीला आईने मला दुध पाजायला प्रवृत्त केले.त्या वडरीन तथा मारवाडीन मावशी अर्थात ‘ दुधमायच्या ‘ निःस्वार्थी मायेने व अव्यवहार्य वात्सल्याने मी ३ वर्षापर्यंत तिच्या दुधावर पोसलो गेलो.चोपड्याला डॉ. हरताळकरांच्या दवाखान्यात मोठी बहिण नबा मरणासन्न असतांना मला भेटण्याची तिची अंतिम ईच्छा दुसरा मुलगा तत्काळ उभा करून पुर्ण केली हे गंभीर प्रसंग सांगतांना बाविस्करांचा कंठ दाटून आला.त्याप्रसंगी उपस्थितांचेही डोळे पाणावले.चोपड्याच्या मयुर सरांमुळे चित्रपटातील गाणी शास्त्रीय रागदारीवर असतात हे आयुष्यात पहिल्यांदा माहित झाले.तथापि सुर श्वासमय झाल्याने फारसा सराव करावा लागला नाही ! त्यावेळी वाद्यशिक्षण न घेताही ट्रम्पेटची माझी धुन जिल्ह्यात खुप चर्चेत होती !
मुलाखतकार तथा व्रतस्थ वाचक प्रशांत गुरव यांनी लीळाचरित्र व ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ आत्मकथनातील साम्यस्थळे सोदाहरण सिद्ध करून बाविस्करांच्या संवेदनशील अवलोकनाची व्याप्ती,लेखनाचा वाङमयीन दर्जा व वैचारिक उंची अधोरेखित केली.बाविस्करांचे आत्मकथन हे प्रवासवर्णन व व्यक्तिचित्रणाचे अद्वैत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले ! गुरव यांच्या समयोचित प्रश्नांन्वये बाविस्कर म्हणाले की,’ भौगोलिक व ऐतिहासिक स्थळांचा संदर्भ देतांना सनावडया व तत्कालीन कालखंडात न शिरता ग्रामपरंपरा व दंतकथांच्या परिरस्पर्शाने सासू सुनेची विहीर ,साखरबाहुली,इदगाह भिंत याबाबत चालीरीती अन् ग्रामसंस्कृती उत्कृष्टपणे शब्दांकीत झाल्याबद्दल मान्यवर लेखकांनी कौतुकाची थाप दिली याचा परमानंद वाटतो.आयुष्यातील काही घटना त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या.आपल्या जीवनात आईचे महत्व खूप असते.ती अनेक आघाड्यांवर लढून संसार सांभाळते.बाया स्वतःची दुःख झावरी सारख्या शिऊन घेतात.त्यांच्यात असणारे हे शहाणपण,त्यांच्या अंगी असणारे बळ हीच आपल्या जगण्याची प्रेरणा असते.सुत्रसंचालन सुनिल पाटील व आभार प्रदर्शन गौरव महाले यांनी केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ कवी बाळकृष्ण सोनवणे,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख कवी विजय लुल्हे , प्रा.विनोद पाटील,पत्रकार ॲडव्होकेट बाळकृष्ण पाटील,कवी रमेश पाटील ,शरद पाटील अडावदकर ,गझलकारा योगिता पाटील,विशाखा शरद पाटील,शिवम गुरव,श्रीकांत कुलकर्णी,तुषार लोहार,संजीव शेटे ,सुलेखन सम्राट पंकज नागपुरे,चित्रकार जितेंद्र साळुंके ,आशुतोष गुरव यांसह म.सा.प.सदस्य व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here