चिमुर/प्रतिनिधी –
पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद उर्दु उच्च प्राथमिक शाळा चिमुर येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महेविश अनिस शेख यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका कु. कमरुनिसा मो. अली सय्यद यांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला, मौलाना आझाद यांचे मुळ नाव मोहिनुद्दीन अहमद पण “अब्दुल कलाम” ही पदवी आणि “आझाद” (स्वतंत्र) हे टोपणनाव त्यांना लोकांनी दिले, त्यांची जन्मभूमी महंमद पैगंबराचे गाव मक्का असुन कर्मभुमी आपला देश आहे. त्यांचे वडील धर्मगुरु होते. वडीलांबरोबर १८९० मध्ये ते कलकत्ताला आले. फार्सी, अरबी, उर्दु याबरोबर ते तत्वज्ञान, तर्कशास्त्र व गणित शिकले. इंग्रजीचाही त्यांनी अभ्यास केला. लोकजागृतीसाठी १९१२ ते १९१५ मध्ये “अल-हिलाल” व “अल बलाघ” वृत्तपत्र काढले. हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी मुसलमानांनी देशाच्या स्वातंत्र्य लढयात भाग घ्यावा यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.
इंग्रज सरकारने त्यांना आंदोलनात भाग घेतल्याने तुरुंगात पाठविले. १९३९ पासुन १९४६ पर्यंत ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय मंत्रीमंडळात ते आपल्या देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते. मौलाना आझाद प्रभावी वक्ते व उत्तम लेखकही होते. त्यांनी उर्दुत अनेक पुस्तके लिहीली. त्यांचे “इंडिया विन्स फ्रिडम” हे आत्मचरित्र प्रसिध्द आहे. त्यांच्या या महान कार्याबद्दल १९९२ ला भारतरत्न हा भारतीय सर्वोच्च सन्मान पुरस्कार देवुन केंद्र शासनाने गौरव केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महेविश शेख होत्या, प्रमुख पाहुणे शहनाज अंसारी या होत्या. याप्रसंगी बालआनंद मेळावा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या, कार्यक्रमाचे संचालन माजी मुख्याध्यापक मुस्तकिम पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार अबुजर कुरेशी यांनी मानले.