Home महाराष्ट्र मराठी भाषा गौरव दिनी फुले एज्युकेशन फाउंडेशन तर्फे घनश्याम व करिश्मा यांचा...

मराठी भाषा गौरव दिनी फुले एज्युकेशन फाउंडेशन तर्फे घनश्याम व करिश्मा यांचा ४८ वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा होणार संपन्न!

276

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : फुले, शाहू, आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन, पुणे च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि. २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनी सायंकाळी ५:३० वा धायरी, पुणे येथील निसर्ग मल्टीपर्पज हॉलमध्ये उच्चशिक्षित सत्यशोधक घनश्याम (साहाय्यक प्राध्यापक, पुणे) व सत्यशोधिका करिश्मा (सिनिअर ग्राफिक डिझायनर,पुणे) यांचा ४८ वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. घनश्याम हा जळगाव जिल्ह्यातील साकळी येथील रहिवासी श्रीमती मंगला प्रल्हाद देवरे यांचा सुपुत्र असून करिश्मा ही नशिराबाद येथील रहिवासी मंगला टापरे (शिक्षिका) यांची सुपुत्री आहे व दोघेही काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत.
या वधू-वरांची रजिस्टर नोंदणी करून विवाहप्रसंगी *संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक* यांच्या शुभहस्ते वधू-वरांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात येणार आहे. वधू-वरांच्या पालकांना व मामा-मामींना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. या लग्नाच्या विधिंसाठी विधिकर्ते एकही रुपया न घेता मोफत विधी पार पाडणार आहेत.
यावेळी अक्षता म्हणून तांदुळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जाणार आहे तर महापुरुषांचे ग्रंथ व ज्योती म्हणजेच *ज्ञानज्योतीभोवती सप्तपदी घेऊन वर – वधू सोबतीने सात वचने घेणार आहेत.*
मंगलाष्टकांचे गायन अमित राणे करणार आहे व नेहमीप्रमाणे सर्व विधी सत्यशोधक रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत करणार आहेत.
*या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आवर्जून शुभ संदेश व शुभेच्छा दिलेल्या आहेत.*
वधू करिश्मा व वर मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे यांनी *हुंडा, मुहूर्त, अंधश्रद्धा, कर्मकांड,* इत्यादी अनिष्ट प्रथांना मूठमाती देत मराठी भाषा गौरव दिनी दोघांनीही आपल्या पालकांची व नातेवाईकांची संमती घेऊन नाहक आर्थिक उधळपट्टी न करता महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व सत्यशोधक विवाहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सत्यशोधक पद्धतीने विवाह करीत असल्याचे सांगितले.
विधिकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, “४७ वा सत्यशोधक विवाह २५ फेब्रुवारीला आदिलाबाद, तेलंगणा येथे लावणार असून लगेचच पुणे येथे २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंहगड परिसरात *प्रथमच* मंगल कार्यालयात हा सत्यशोधक विवाह लावत असून या पूर्वी संस्थेचे वतीने बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात महात्मा फुले जयंती दिनी आंतरजातीय, उच्चशिक्षित व दोन विधवा-विधुर यांचा पुनर्विवाह असे ३ विवाह देखील मोफत लावले आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here