धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील
धरणगाव — येथे कुळवाडीभूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली व शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये मुलं – मुली, युवक – युवती, महिला – पुरुष व आबालवृद्धांचा म्हणजेच शिवप्रेमींचा लक्षणीय सहभाग होता.
सर्वप्रथम बालाजी मंदिर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून रॅलीची सुरवात झाली. रॅलीत असलेल्या बग्गीमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली नितीन पवार यांनी राजमाता जिजाऊ तसेच इ.पहिल्याचा रोनित रविंद्र बाविस्कर याने बाल शिवबाची वेशभूषा साकारली. शिवशक्ती ढोलपथक च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी(महिला-पुरुष) व गुरुकुल इंग्लिश मीडियमच्या झेंडा पथकातील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या भव्य रॅलीत युवकांनी बँड च्या तालावर ठेका धरला यामध्ये शिस्तबद्धता व स्वयंशिस्त लक्षवेधी ठरले. रॅलीच्या मार्गादरम्यान धरणी चौकात तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले, भूतपूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना भाजप, शिवसेना, उबाठा सेना, भा.रा.कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट) यांच्यासह महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. ही भव्य रॅली बालाजी मंदिर, धरणी चौक, कोट बाजार, बालाजी पतसंस्था, लांडगे गल्ली, परिहार चौक, सुभाष दरवाजा, मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर आबासाहेब छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ रॅलीचा समारोप झाला. ही रॅली तसेच शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याऱ्या सर्व देणगीदारांचे तसेच वेडिंग बाय गोपी, वास्तव डिजिटल, जगदंबा टेंट, कृष्णा टेंट, आनंद टेंट, विजय बँड अमळनेर, पांडुरंग महाराज फेटेवाले, उमेश महाजन – अमोल महाजन बग्गीवाले, ट्रॅक्टर किशोर (बालू) पाटील, धरणगाव नगरपरिषद, पोलीस प्रशासन, होमगार्ड कर्मचारी इ. अनेकांचे (नकळत नाव राहिले असतील असे सर्व शिवप्रेमींचे) अनमोल सहकार्य लाभले.
शिवजन्मोत्सव २०२४ च्या भव्य मिरवणुकीत भाजप, शिवसेना, उ.बा.ठा. सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार आणि अजित पवार गट) भा.रा.कांग्रेस यांच्यासह गावातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, अध्यात्मिक, शासन – प्रशासन, सेवाभावी संस्था, विधी व न्याय, अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व समाज बांधव यांच्यासह सर्व शिवप्रेमी युवकांची लक्षणीय उपस्थिती बघायला मिळाली. शिवजन्मोत्सव २०२४ चा सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या भव्य रॅली व शोभयात्रेच्या निमित्ताने “शिवराय फक्त इतिहासाच्या पानात नव्हे तर प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आहेत” याचा प्रत्यय याची देही याची डोळा धरणगाव शहर व तालुक्यातील असंख्य नागरिक बंधू – भगिनींनी अनुभवला.