Home महाराष्ट्र दुसरी छत्रपती शिवराय विचार जागर परिषद 19 फेब्रुवारीला! ...

दुसरी छत्रपती शिवराय विचार जागर परिषद 19 फेब्रुवारीला! ॲड. प्रकाश मोरे, हिंदुराव हुजरे-पाटील यांना छत्रपती शिवराय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

61

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) आपल्या सर्वांचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत, वास्तववादी व सामाजिक क्रांतीचा इतिहास, त्यांचे समग्रविचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. 19 फेब्रुवारी, 2024 रोजी सायं. 5:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या छत्रपती शिवराय विचार जागर परिषद आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. अमर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत विचारवंत आणि पत्रकार ताज मुल्लाणी, कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने, सिने अभिनेते दत्तात्रय गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या निती उराडे आदी मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार आहेत.
यावर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा छत्रपती शिवराय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार अपरिचित छत्रपती शिवरायांचे अभ्यासक आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. प्रकाश मोरे, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव हुजरे-पाटील यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयांची पुस्तके असे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज समग्र मानव जातीचे आदर्श होते. त्यांच्या विचारांना अपेक्षित असे रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले कार्य समजून घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कारासाठी जमाते-ए-इस्लामी हिंद या संघटनेसह विजयकुमार कांबळे, अमोल सावंत, लक्ष्मण माळी, शंकर पुजारी, काळूराम लांडगे, चंद्रकांत घाटगे, संजय ससाणे यांची निवड करण्यात आली आहे.
निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, बालसाहित्य कलामंच, सत्यशोधक प्रागतिक विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच आदी संस्था या परिषदेच्या आयोजक असून दुसरी छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. शोभा चाळके, पुजा जाधव, डॉ. नामदेव मोरे, अश्वजीत तरटे, रणजीत कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here