✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. ४ फेब्रुवारी)
नवीन पिढीने चिकाटीने मेहनत करून व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनदृष्टी विकसित करावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी केले.
ते येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रसिद्ध कवी, गीतकार जावेद अख्तर यांच्या ‘तरकश’ कवितासंग्रहातील काही ओळींचा दाखला दिला. ‘आओ, चलके सुरज ढुंढे, और न मिले तो, किरण – किरण जमा करे हम, और एक सुरज नया बनाये हम…’
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर व ‘हास्य सम्राट’ के. सिद्धार्थ उपस्थित होते.
विविध उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी वैज्ञानिक विश्वाचे एक उदाहरण दिले.
विज्ञानात अंतिम सत्य कधीच नसते. यश, अपयश व पुन्हा यश या माध्यमातून ही प्रक्रिया चालू राहते. तशाच पद्धतीने प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास सुरू राहतो.
तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न थांबवायचे नसतात, तर नवीन जोमाने आपल्या चुका दुरुस्त करून काम करायचे असते. तेव्हाच तो खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो.
यावेळी ‘हास्य सम्राट’ के. सिद्धार्थ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वेगवेगळे आवाज काढून दाखवत हसवून त्यांचा परीक्षेतील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. बालाजी लाभसेटवार यांनी केले तर आभार प्रा. मिलिंद कांबळे यांनी मानले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.