मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची तसेच शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर योजनांची माहिती देणारी यंत्रणा ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची आहे. कृषी अधिकारी कार्यालयातूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मोर्शी येथील कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी प्रभारावर असल्याने तालुका कृषी कार्यालयाचा कारभार ढेपाळला आहे. ग्रामीण भागात कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यकाची भेट होणे दुर्लभ झालेले आहे. त्यामुळे हे कार्यालय कुचकामी ठरले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने कार्यालयाचा कारभार मनमर्जीने सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांच्या उदासीन कार्यपद्धतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे.
कृषी कार्यालयांतर्गत शेतकऱ्यांच्या लाभाच्या फळबाग, शेततळे, नाला बंदिस्त, कृषी अवजारे, ठिबक संच व तुषार संच अनुदान योजना राबविण्यात येतात. तसेच एकात्मिक किड नियंत्रण कार्यक्रम यासह अन्य शेतकरी हिताचे कार्यक्रम राबविले जातात. परंतु तालुका कृषी अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे कार्यालयाचे प्रभारी अधिकारी कर्मचारी हेच कार्यालयात मीटिंग, दौरा यासह विविध कारणाने अनुपस्थित राहत असल्याने कुठल्याही कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही.
परिणामी हम करे सो कायदा याप्रमाणे कर्मचारी वर्ग कार्यालयीन वेळेत कधीही आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर आढळून येत नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा असलेला घटक हा कृषी सहाय्यक असतो.परंतु तालुक्यातील कृषी सहाय्यक हे गावात जाऊन शेतकऱ्यांना माहिती देताना कधीच दिसून पडत नाही.कृषी विभागाच्या योजना गोरगरीब शेतकऱ्यांना न देता आपल्या मर्जीतील धनदांडग्यांना दिल्या जाता असल्याचे निदर्शनास येत आहे.
मोर्शी तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे कृषी अधिकाऱ्याचा प्रभार मंडळ अधिकाऱ्यांकडे असल्याने मोर्शी तालुका कृषी कार्यालयात रामभरोसे काम सुरु आहे. यावर्षी तालुक्यात गारपिट अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. गारपिट, अतिवृष्टीचे नुकसानीची रक्कम अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.पीक विमा कंपनीने अजूनही शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केलेले नाही. तसेच पीक विमा, फळ पीक वीमा नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.असे असताना नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने वाऱ्यावर सोडले आहे.
* संत्रावरिल संकटांमुळे शेतकरी बेजार.
निसर्गाच्या लहरिपणामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आला असताना सोयाबीन पिकावर येलो मोझाॅक व कापूस पिकावर बोंडअळी, तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तुरीच्या पिकाचा बुडापासूनच खराटा झाला, मृग बहाराच्या संत्राला लागलेली गळती, संत्रा झाडांवर शेंडे मर रोगाचा प्रादुर्भाव यासह विवीध रोगांमुळे संत्रा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे मात्र कृषी विभागाकडून या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.