महात्मा जोतीराव फुले यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेऊन शिवजयंती साजरी केली. त्या प्रसंगाने सत्यशोधक चित्रपटाची सुरूवात करण्यात आली. विद्येविना मती गेली… एवढे अनर्थ एका अविद्यने केले. ह्या महात्मा फुले लिखित विचार गीताने वातावरण निर्मिती करून प्रेक्षकांच्या हृदयाला हात
घातला.डॉ.आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा,संघर्ष करा हा विचार पेरण्याचा प्रयत्न केला.ज्योतीराव व सावित्रीबाईंच्या विवाहाचा प्रसंग चित्रित करून चित्रपटाचे कथानायक पुढे पुढे सरकत जाते. विद्यार्थी दशेतील ब्राम्हण मित्राच्या लग्नात शुद्र म्हणून जोतीरावांचा केलेला अपमान, त्यांच्या जिव्हारी लागला,त्यांचे चिंतनशील मन पेटून उठण्यास ती घटना कारणीभूत ठरली !
महात्मा फुलेंनी स्पृश्य-अस्पृश्य यांच्यातील विषमतेची दरी नष्ट व्हावी व समता प्रस्थापित व्हावी म्हणून स्वत:च्या राहत्या घरची विहीर शुद्रतिशूद्रांना पाण्यासाठी खुली करून दिली आणि सामाजिक क्रांतीची सुरूवात केली. हा प्रसंग जेवढा भावनात्मक, तेवढाच हृदयाला पाझर फोडल्यावाचून राहिला नाही. या चित्रपटात दलितांवरील अन्याय व त्यांचा होणारा अनन्वित छळ दाखविण्यात आला.त्यातून तत्कालिन समाज व्यवस्थेविरुद्ध चिड निर्माण होते.एवढे प्रखर पण तेवढेच वास्तव चित्रण दाखविण्यात दिग्दर्शक श्री. निलेश रावसाहेब जळमकर हे यशस्वी झालेत.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकार्याचा एक एक प्रसंग पुढे पुढे जातो आणि प्रेक्षकांच्या मनाची उत्कंठा वाढत जाते.महात्मा फुलेंनी १७५ वर्षापूर्वी मनुवादी विषमताधिष्ठित समाज व्यवस्थेविरुध्द रणशिंग फुंकले. सन दि.१जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.त्यांचा सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचा लढा,त्यांचा समतेसाठी – न्यायासाठी व मानवतेसाठीचा संघर्ष तसेच प्रस्थापितांनी महात्मा फुलेंना मारण्यासाठी पाठविलेले मारेकरी आणि त्यांचे झालेले मनपरिवर्तन हे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणण्यास पुरेसे आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाईनी मुलींना शिकवू नये म्हणून त्यांचा प्रस्थापितांकडून केलेला छळ, त्यामुळे नाऊमेद न होता सुरू ठेवलेले प्रयत्न,फुले दाम्पत्यांचा घर सोडून जाण्याच्या प्रसंगातून तसेच अर्धांगवायूमुळे उजवा हात निकामी झाल्यानंतरही डाव्या हाताने लेखन करण्याची जोतीरावांची जिद्द ही
सर्वसामान्यांना प्रेरणा देऊन जाते.
” सत्यशोधक ” या
चित्रपटातील प्रत्येक घटनेतील लहान लहान बाबीवर विशेष लक्ष देण्यात आल्यामुळे प्रेक्षक कळत- नकळत चित्रपटाचा एक भाग बनतो. कथानकाशी एकरूप होतो.अंधारातून प्रकाशाकडे, विषमतेकडून समतेकडे, धर्माधतेकडून बुध्दी प्रामाण्यवादी विचाराकडे नेणारा हा चित्रपट प्रत्येकाने पुन्हा-पुन्हा पहावा असा आहे. अलिकडे धर्मांधतेला खतपाणी घातले जात आहे. पुन्हा पेशवाई आणल्या जात आहे. तेव्हा सत्यशोधक चित्रपटाची अनिवार्यता वाटते.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी दि.३० जानेवारी १९५४ रोजी महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते.त्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे दलित -आदिवासींसह उच्चवर्णीय मुलींना देखिल खुली करून दिली म्हणूनच आज आदिवासी समाजातील महिला ह्या शिकून राष्ट्रपती पदावर विराजमान होऊ शकल्या तेंव्हा फुले दाम्पत्यांना गुरुदक्षिणा म्हणून महामहिम राष्ट्रपती महोदयांनी “भारतरत्न ” ह्या सर्वोच्च पुरस्काराने आणि ” सत्यशोधक ” या मराठी
समाजप्रबोधनपर वैचारिक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करावे.
” सत्यशोधक ” हा प्रेरणादायी चित्रपट समता फिल्मस् आणि अमिता फिल्मस् प्रोडक्शन प्रा. लि. प्रस्तुत असून श्री निलेश रावसाहेब जळमकर हे या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. श्री. प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, सुनिल शेळके, विशाल वाहूरवाघ हे निर्माते तर राहुल वानखडे, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे, बाळासाहेब बांगर हे सहनिर्माते आहेत. श्री महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्य-निर्माते आहेत.अमित राज यांचे श्रवणीय संगीत असून समित फातरपेकर यांचे पार्श्वसंगीत आहे.अरुण प्रसाद यांचे छायाचित्रण तर विजय खोचीकर यांनी संकलन केले. श्री सुमित गणोरकर हे या चित्रपटाचे प्रोडक्शन आहेत तसेच विश्वनाथ मेस्त्री,अर्जुन राठोड,संदीप इनामके यांची कलात्मता चांगली आहे.
महात्मा फुले यांच्या प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेते संदीप कुळकर्णी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी दमदार अभिनय केलेला आहे तसेच गणेश यादव,सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी,अमोल बावडेकर, राहुल तायडे,अनिकेत केळकर, सिध्देश्वर झाडबुके आदी नव्या-जुन्या कलाकारांनी जबरदस्त अभिनयाने
” सत्यशोधक ” या चित्रपटात जीव ओतला.शासनाने या चित्रपटाला टॅक्स फ्री करून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले त्याबदल शासनाचे आभार .
अमरावतीच्या राजकमल टॉकीजमध्ये ” सत्यशोधक ” चित्रपट बघताना जणू काही आपणही महात्मा फुले यांच्या मानसिक गुलामगिरी विरुद्धच्या लढ्यात सोबत आहोत की काय असे वाटते . असा हा वास्तववादी चित्रपट आहे तेव्हा आपण बघा आणि इतरांना सुद्धा बघावयास सांगा !
समीक्षक
प्रा.श्रीकृष्ण बनसोड
(समाजभूषण)
मो.क्रं.९७६३४०३७४८
प्रा.अरुण बा.बुंदेले
( साहित्यिक )
मो.क्रं.८०८७७४८६०९