Home लेख नामांतर दिन आंदोलनाची प्रेरणा

नामांतर दिन आंदोलनाची प्रेरणा

111

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिवस एक आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यामागे तसे कारणही आहे. आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्टीने मागास असलेल्या मराठवाडा प्रदेशात शिक्षणाचे रोपटे लाऊन जागतिक पातळीवरचे अभ्यासक, इतिहासकार, राजकीय नेते, साहीत्यीक, अधिकारी घडण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थेने केले. जेथे शिक्षणाचा गंधही नव्हता तेथे शिक्षणरुपी रोपट्याचा बगीचा तयार करून त्याचा फायदा अगदी गोरगरीब, व शैक्षणिक दृष्टीने मागास लोकांना होऊन त्यांचा शैक्षणिक विकासा सोबतच सामाजिक व आर्थिक विकास करण्यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य खुप महत्त्वाचे आहे. औरंगाबाद या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः हजर राहुन शैक्षणिक पायाभरणी केली हि बाब फक्त मराठवाड्या साठी नाही तर संपुर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक कार्य व विचार जागतिक पातळीवरचे असुन भारताचा सन्मान वाढणारे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ विद्वतेतुन निर्माण झालेल्या संविधानाने हजारो वर्षांपासून ची विषमतावादी व एकहाती सत्ता बदलून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार व संधी बहाल केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे बघताना जातीचा चष्मा उतरून ज्ञान, कार्य व विचार यांच्या कडे डोळस बघितले तर आधुनिक भारताचे निर्माते खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत असे दिसून येते. देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतः ची ओळख निर्माण करून देऊन स्वाभिमान बहाल करणारे आणि मुक्त पणे जिवन जगण्याचा अधिकार देऊन त्याचे संरक्षण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर महानच आहेत. अशा महान व विद्वान महापुरुषांच्या कर्मभुमी मध्ये कोणतेही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वा राजनैतिक काम होते तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून चालणार नाही. म्हणून ज्या मराठवाड्यात शिक्षणाचा गंधही नव्हता तेथे शिक्षणाचा प्रवाह आणून पुढे त्याच शहरात विद्यापीठ स्थापन व्हावे आणि त्या विद्यापिठाला महामानवाचे नाव नसावे ही गोष्ट वैचारिक व नैतिक पातळीवर पटणारी नव्हती. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचारांना जाणणऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापिठाला मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले. ज्या महामानवामुळे देशाची ओळख जगात निर्माण झाली, ज्या महामानवामुळे माणसाला माणूस पण आले अशा महामानवाचे नाव विद्यापिठाला देण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यापेक्षा जास्त दु:खाची कोणती गोष्टी असेल. विषमता, जातीवाद, भेदभाव डोक्यात असलेल्या सडक्या लोकांच्या मेंदूमुळे नामांतर लढ्याला वेगळे वळण लागले. गोरगरीब आंबेडकरवादी समाजावर अन्याय, अत्याचार, बहिष्कार, टाकून आंदोलनाला हिंसक वळण लावून अनेक घरांना आग लाऊन घराची राख केली. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे हक्क अधिकार शिक्षण नोकरी मिळवणाऱ्या लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जातीत बंद करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीच्या लोकांवर हल्या करणे हे वैचारीक व नैतिक पातळी कीती खालावलेली असेल याचे उदाहरण आहे. अनेक संकटाचा सामना करून, जिवाची पर्वा न करता, सर्व सामान्य माणसांनी उभा केलेला लढा उग्र रुप धारक करत होता. जातीवादी पिलावळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोधच करत नव्हते तर त्यांच्या अनुयायांचे दैनंदिन जिवन विस्कळीत कसे होईल याचे नियोजन करत होते. संकटे अनेक असली तरीही लक्ष्य मात्र एकच होते. ते म्हणजे विद्यापिठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे. यामध्ये तत्कालीन आंबेडकरवादी व समतावादी नेतेही पद प्रतिष्ठा व मानपानाचा विचार न करता एक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणून सहभागी झाले व आंदोलनाला बळकटी देण्याचे काम एकीकरणातुन झाले. विद्यापिठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाम मिळण्यासाठी औरंगाबाद मध्ये विद्यार्थीही रस्त्यावर येऊन जिवाची पर्वा न करता लढत राहीले. नागपूर येथे झालेल्या पहिल्या गोळीबारात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन हे शहीद झाले, तर गोळीबारात जखमी झालेल्या अविनाश अर्जून डोंगरे या ११ वर्षांच्या बालकाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या गोळीबारात दिलीप सूर्यभान रामटेके, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी कुत्तरमारे, रतन मंदेडे हे ५ भीमसैनिक शहीद झाले. तर मराठवाड्यामध्ये पोचीराम कांबळे, सुहाशीनी बनसोड, प्रतिभा तायडे, जनार्धन मवाडे, गौतम वाघमारे, नारायण गायकवाड, रोशन बोरकर, पोलीस अधिकारी गोविंद भुरेवार यांना जिव गमवावा लागला. गौतम वाघमारे, सुहासिनी बनसोडे, प्रतिभा तायडे यांनी स्वतः लाच संपवून नावा साठी शहीद झाले. राजकीय नेत्यांसोबतच सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदानही विसरता येणार नाही. निच व जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी घरे जाळलेच नाहीत तर ती लुटून आर्थिक हानी केली, महिलांवर बलात्कार करून स्वतःला कीती नितीभ्रष्ट आहेत हे सिद्ध करून दिले. गर्वभवती, व लहानमुले असलेल्या महिला व बालकांना सुद्धां यामध्ये आपले जिवांचे दान द्यावे लागले. सोळा वर्षे चाललेल्या संघर्षाची घटना डोळ्यासमोर उभी जरी केली तरीही अंगावर काटा येतो. तरीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी खचले नाही, झुकले नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापिठाला मिळेपर्यंत शांत न बसणारा समाज विद्यापिठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊनच शांत झाला. नामांतर लढ्याचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीचे नसले तरीही कोणत्याही एका व्यक्तीला विसरून नामांतर लढा सांगता येणार नाही. नामांतर लढ्यात शहिद झालेले, लढा सतत मजबूत करणारे, राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, महिला, तरुण, बालक या सर्वांचेच महत्त्वाचे योगदान या लढ्यातुन कमी करता येणार नाही. विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाल्या पासून दरवर्षी १४ जानेवारी ला नामविस्तार दिन विद्यापीठ गेटसमोर शहिदांना आदरांजली वाहून केला जातो. तरुणांचा जिव गेला परंतु लढा जिंकला याचे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी वैचारिक अनुयायी येत असतात. नामविस्तार दिन साजरा करणे म्हणजे वैयक्तिक जाहिरात करणे मुळीच नसुन या दिवशी आपल्याला आंदोलनाची प्रेरणा मिळते. आंदोलन कसे असावे आणि ते कसे लढावे याचे जागतिक किर्तीचे उदाहरण म्हणजे १४ जानेवारी होय. म्हणून विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करताना वैयक्तिक जाहिरात होणार नाही, आपली बेकी दिसणार नाही, आणि सर्वसामान्य मानसांना आंदोलन, लढा यामधून आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जावा. वर उल्लेख केलेल्या शहिदापेक्षाही जास्त तरुण तरुणी शहीद झाले, दंगली मध्ये मारल्या गेले. त्या सर्वाचे जिवाचे दान केवळ विद्यापिठाला नाव मिळावे यापुरताच विचार न करता जेव्हा केव्हा हक्क अधिकार स्वाभिमान आणि संविधानाचा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा तेव्हा आम्ही याच ताकतीने पुन्हा आंदोलन उभे करून न्याय हक्क मिळवून घेऊ हि शिकवण प्रत्येकाच्या मनात रुजवून पुन्हा आंदोलनासाठी सज्ज राहण्याचा संदेश या दिनी सर्वांपर्यंत जाने आवश्यक आहे. नामविस्तार दिन साजरा करताना दिनाचे मुळ महत्त्व बाजूला सारून राजकीय जाहिरात न होता, चळवळ, आंदोलन याची प्रेरणा मनामनात रूजवावी हीच अपेक्षा. नामांतर लढ्यात शहिद झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात शहिदांना, महिला, तरुण, कार्यकर्ते, ज्यांनी घराची राख, बलात्कार, मृत्यू, गावबंदी, बहिष्कार, आर्थिक हानी, लहान मुलांचा मृत्यू सहन करून लढा बळकट केला त्या सर्वांना मानाचे वंदन. नामविस्तार दिनाच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा..

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here