Home पुणे आमदार-खासदारांनी वारंवार राजकीय पक्षांतरे करू नयेत-माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू एमआयटी...

आमदार-खासदारांनी वारंवार राजकीय पक्षांतरे करू नयेत-माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू एमआयटी डब्यूपीयूत १३ व्या ‘भारतीय छात्र संसद’ चे नायडू यांच्या हस्ते उद्घाटन

97

 

 

पुणे, : राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आमदार – खासदारांनी सतत पक्षांतरे करू नयेत. लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण एकमेकांशी शत्रुत्व नसावे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी बुधवारी येथे केले.”राजकीय कारकीर्द घडवू इच्छिणार्‍या युवा विद्यार्थ्यांसमोर पक्षबदलाचे, गोंधळाचे, घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता, एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणे समोर ठेवावीत, असेही ते म्हणाले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. १० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांचे सहकार्याने छात्र संसदेला मिळाले आहे.

याप्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार, वक्ते व लेखक प्रा. रामचरण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी, यू. टी. खादेर फरीद, उत्तर प्रदेशचे सतीश महाना, मध्य प्रदेशचे गिरीश गौतम यांच्यासह एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नायडू पुढे म्हणाले,’राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावे. विचारधारा भिन्न असतील, दृष्टीकोन वेगळे असतील, पण संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पहिजे. एकविचारानेच आपण नव्या युगातील भारत घडवू शकणार आहोत. राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी सतत पक्षबदल केले, की सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या कामातील रस संपतो. जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडणे, हे धोक्याचे आहे. सत्ताधारी गटाच्या चुकीच्या, अयोग्य धोरणांना, कृतींना विरोधकांनी अवश्य विरोध करावा, लोकशाहीने ती ताकद प्रत्येकाला दिली आहे. पण याचा अर्थ असा नव्हे, की विरोधकांनी गदारोळ, घोषणाबाजी करून संसदेच्या कामकाजात सतत अडथळे निर्माण करावेत. त्यांनी विरोधक असावे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनू नये. कोणत्याही परिस्थितीत संसदेचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

डॉ. रामचरण यांनी विद्यार्थ्यांमध्ये जात भावी जीवनात उपयुक्त ठरणारी चतुःसूत्री सांगितली. नवकल्पना, समस्या नेमक्या ओळखणे, त्यांचे स्वरूप जाणणे हे काम युवा पिढीचे आहे. त्यासाठी कामावरची निष्ठा आणि ध्यास आवश्यक आहे. नेतृत्वच देश घडवत असते आणि सर्व प्रकारचे बदल नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असतात, असे ते म्हणाले.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ’युवा पिढीला भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, परंपरा यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. जागतिक तुलनेत भारतीय संस्कृतीचे वेगळेपण देशाच्या तरुण पिढीने जाणून घेतले पाहिजे. नव्या तंत्रक्रांतीच्या युगात भारत विश्वगुरू या संज्ञेला पात्र ठरत आहे, याचा अभिमान बाळगला पाहिजे. परंपरा आणि नव्या युगामध्ये एकाच वेळी वावरताना जी संभ्रमावस्था दिसत आहे, त्यातून मार्ग दाखवण्यासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे,’.
राहुल कराड म्हणाले, ’उच्चशिक्षित पिढी राजकीय क्षेत्रात कार्यरत व्हावी, आणि त्याद्वारा लोकशाही समाजजीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी साह्य मिळावे, समस्यांच्या मूळाशी जाऊन त्यावरील उपाययोजनांचा विचार व्हावा, या उद्देशाने भारतीय छात्र संसद उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतून प्रेरणा घेत देशात अनेक ठिकाणी, विद्यापीठांमध्ये स्थानिक पातळीवर छात्र संसदेचे उपक्रम सुरू व्हावेत, ही इच्छा आहे. यासाठी राजकीय नेते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी पक्षातीत – विचारांपलीकडे जात किमान समान कार्यक्रम कसा तयार करता येईल, यावर काम करावे.
यावेळी राहुल कराड यांचा छात्र संसद उपक्रम यशस्वी करत असल्याबद्दल मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
एमआयटीचे कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. डॉ. के. गिरिसन यांनी आभार मानले तर डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीला एमआयटी कल्चरल क्लबच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून, तसेच डेमाक्रसी बेल वाजवत १३ व्या छात्र संसदेचे अधिकृत उद्घाटन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here