✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
उमरखेड (दि.13 जानेवारी) तालुक्यातील काही अंतरावरच बिटरगाव, जेवली, बोरी, माणकेश्वर, साखरा, चातारी, कारखेड खरूस, टाकळी व अनेक ठिकाणावरून ट्रेझर बोटीच्या सहाय्याने रेती वर काढल्या जाते व नदी पात्रात रेतीचे ढिगारे पहावयास मिळत आहेत.
पैनगंगा नदी पात्रातून मध्यरात्री, तर कधी दिवसाढवळ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती तस्करी केली जात आहे. त्यामुळे सरकारचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.
परंतु प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत मुंग गिळून गप्प आहे.
10 ते15 ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती आणून गावात 8 ते 10 हजार रुपये ट्रॅक्टर याप्रमाणे विकली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना झळ सोसावी लागत आहे. तर रेती तस्कर मालामाल होत आहे.
शासनांनी घाटाचा लिलाव केल्यास सर्वसामान्य जनतेला कमी दराने रेती उपलब्ध होईल व त्यामुळे रखडलेली बांधकाम करण्यास सुरुवात होईल. प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता त्वरित रेती तस्करावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे रेती तस्कर सैराटपने नेणारे ट्रॅक्टर बंद होतील.
ट्रॅक्टर धारकांकडून कर्मचाऱ्यांचे हप्ते चालू असल्याची गावा गावात स्फोटक अशी चर्चा आहे.तसेच मंडळाधिकारी, तलाठी,पोलीस प्रशासन नायब तहसीलदार यांच्यात मिलीभगत असल्याचे चर्चेला उधाण आले आहे. अभयारण्यात रात्रीच्या वेळी प्रवेश बंदी असताना सुद्धा रेती तस्करी कशी केली जाते हाही एक संशोधनाचा विषय आहे.
फॉरेस्टच्या डोळ्यात अंजन घालून तर बिटरगाव पोलीस स्टेशनच्या नाकावर टिचून कधी पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या रस्त्याने तर कधी पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्त्याने खुलेआम रेती तस्करी केली जात आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनानी यावर लगेच आवर घालण्याची आवश्यकता आहे.