Home अमरावती मराठी ग्रामीण साहित्यात विद्रोह असून ते समृद्ध आहे- डॉ.सतीश तराळ ...

मराठी ग्रामीण साहित्यात विद्रोह असून ते समृद्ध आहे- डॉ.सतीश तराळ संमेलनात ग्रंथदिंडी,कथाकथन, परिसंवाद,कविसंमेलन,पुरस्कार वितरण.

248

 

अमरावती ( प्रतिनिधी )
तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले.लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या संमेलनाचे आयोजन शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन,मुक्ताईनगर व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री विमलाबाई देशमुख
महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात करण्यात आले. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.स्मिता देशमुख होत्या. सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा ओनामा झाला. दिंडीत गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधा नगर, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावती व विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.
संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. याप्रसंगी अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते,ज्येष्ठ पत्रकार व संपादक डॉ. सुधीर भोंगळे, जनसाहित्याचे प्रवर्तक डॉ.सुभाष सावरकर उपस्थित होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश तराळ यांनी लिहिलेल्या ‘राष्ट्ररत्न पंजाबराव देशमुख’ या पुस्तकाचे तसेच उज्जैनकर फाउंडेशन तर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे संचालन ज्योती राणे (जळगाव ) यांनी केले .

अध्यक्षीय भाषणातील ज्ञानकण

संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सतीश तराळ ( सुप्रसिद्ध साहित्यिक – कथाकार)आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,मराठी भाषेत नव्या लेखकांमध्ये चांगले लिहिणारे लेखक आहेत ही समाधानाची बाब आहे.मराठी साहित्यातील साहित्यकृतींना साहित्य अकादमी सारखे महत्त्वाचे पुरस्कार मिळत आहेत. मराठी साहित्य समृद्ध आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा .
कार्ल मार्क्सच्या विचारातून मराठीत दर्जेदार मार्क्सवादी साहित्य निर्मिती झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रचंड प्रमाणात आंबेडकरी साहित्य निर्माण झाले. पण गांधीवादातून गांधीवादी साहित्य निर्माण झाले नाही ही खेदाची बाब आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रज्ञावंत शिघ्र कवी होते त्यांचा ग्रामगीता आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे ते ग्रामीण साहित्याची प्रेरणा असायला हवेत. आधुनिक मराठी ग्रामीण साहित्यात विद्रोह आहे व ते समृद्ध साहित्य आहे ग्रामीण साहित्य मराठी साहित्याची प्रमुख धागा ठरते आहे.”असे विचार व्यक्त केले.

बहारदार कथांनी रंगले कथाकथन

उद्घाटनानंतर झालेल्या मेघना साने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात कथाकार विनोद तिरमारे,मधुकर पोतदार,योगेश जोशी, प्रमोद दिवटे यांनी आपल्या दमदार कथांचे सादरीकरण केले.
—-
“राष्ट्रारत्न डॉ.पंजाबराव देशमुख यांचे क्रांतिकार्य “या विषयावरील परिसंवाद रंगला.

डॉ.सुभाष सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “राष्ट्ररत्न डॉ.पंजाबराव देशमुख यांचे क्रांतिकार्य ” या विषयावरील
परिसंवादात डॉ.सुभाष बागल,डॉ. गणेश चव्हाण,डॉ मंदा नांदुरकर, अनिल प्रांजाळे,डॉ. अशोक शिरसाट यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या क्रांतीकार्याची मांडणी आपल्या परखड शब्दात मांडली. गजानन इटनारे यांनी आभार मानले.

शिव मराठी कविसंमेलनाने
श्रोते झाले मंत्रमुग्ध

प्राचार्य राज यावलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात डॉ.शोभा रोकडे, राजेश महल्ले नीलिमा भोजने, अँड.सर्जेराव साळवे, अभंगकार प्रा.अरुण बा.बुंदेले, डॉ.सुभाष बागल,गणेश साखरे,सुरेश देशमुख,संदीप देशमुख,का.रा.चव्हाण अशा चोपन्न कवींनी आपल्या दमदार, आशयगर्भ व वास्तववादी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कवी संमेलनाचे बहारदार काव्यमय सूत्रसंचालन कवयित्री मा.ज्योती राणे यांनी केले. शाहीर मनोहर पवार व शाहीर निवृत्ती जाधव यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडे सादर करून रसिकांची मनं जिंकली.

तापी पूर्णा पत्रकारिता पुरस्कार
संपादक मा.विलास मराठे यांना प्रदान

या शिव मराठी साहित्य संमेलनात तापी पूर्णा पत्रकारिता पुरस्कार अमरावती येथून प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय दैनिक हिंदुस्थानचे संपादक मा.विलास मराठे यांना प्रदान करण्यात आला. तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रातील पंचवीस मान्यवरांचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे तापी पूर्णा पुरस्कार देऊन भावपूर्ण गौरव करण्यात आला.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाच्या संयोजक डॉ.मंदा नांदुरकर,संमेलनाचे कार्याध्यक्ष नितीन पवित्रकार,संमेलनाचे निमंत्रक डॉ.मंगेश निर्मळ, संमेलनाचे सहसंयोजक डॉ.गजानन घोंगटे,नरेन्द विझे, प्रवीण चींचे, प्रशांत शेंदुरकर, सिमरेला देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
या संमेलनामध्ये शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी,सदस्य, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य तसेच नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here