मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील शेतकरी आधीच संकटात असताना तालुक्यात बहरलेल्या तुरीवर दव गेल्यामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने पुन्हा एकदा मोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने रोग नियंत्रणासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षात कापसाला चांगला हमी भाव मिळत नसला तरी तूर कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. शेतक-याने तूर कपाशीची लागवड करतांना महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा अवस्थेत तूर कपाशीची लागवड केली. अन दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे.
मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे बेहाल झाले असून, बळीराजा हतबल झाला आहे. पिकांची हि परस्थिती पाहून तरी शासनाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन संकटातून बाहेर काढावे अशी रास्त मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.
मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील काळ्या मातीत दिमाखात डोलणारं तुरीचं पीक आज मात्र करपून गेलंय. ढगाळ वातावरणामुळे मोर्शी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. यंदा सोयाबीन कपाशी संत्रा आदी पीकं शेतकऱ्यांच्या हातातून गेली. वर्षभराचं आर्थिक गणित सांभाळणाऱ्या संत्र्याने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीत आणले. आता बळीराजाची उरलीसुरली मदार तुरीच्या पीकावर होती. परंतु वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीनेही शेतकर्यांच्या ‘हातावर तुरी’ दिल्या आहेत. मागील पंधरा दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे तुरीवर दवाळ रोगाचं सावट आलं आहे. वातावरणातील झालेल्या बदलामुळे मोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील तुरी सध्या करपल्या आहेत.
मोर्शी तालुक्यात कपाशी आणि तूर लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती. कपाशी बोंड अळीने आणि अति पावसाने गेली. त्यामुळे तूर तरी तारेल ही त्यांना अपेक्षा होती. पण झालं उलटचं तूर चांगली येईल या आशेने त्यांनी रात्रंदिवस वन्यप्राण्यांच्या पासून तूर वाचावी म्हणून खडा पहारा दिला परंतु आलेल्या ढगाळ वातावरणाने होत्याचं नव्हतं झाल्यामुळे तुरीने त्यांच्या हातावर तुरी दिल्या.
मोर्शी तालुक्यात या वर्षी सुरवातीला पावसाने दगा दिल्यामुळे मृग बहाराचा संत्रा फुटलाच नाही , कापसाला बोंडे धरण्याच्या तर सोयाबीनला शेंगा पकडण्याच्या काळात पावसाने दांडी मारली. आता लाल्यारोग पडल्याने पाती, बोण्ड अलीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनवर करप्या रोग आल्याने सोयाबीनचे उत्पादन झाले नाही, तुरीही करपण्याच्या मार्गावर आहे .शेतकऱ्यांचा आंबिया बहाराचा संत्रा सुद्धा गळून पडल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शासनाने ताबडतोब कपाशी तूर पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नूकसान भरपाई द्यावी —— रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.