१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. दीडशे वर्ष राज्य करून इंग्रज भारतातून निघून गेले. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली पण भारतातील एक छोटेशे निसर्गरम्य बेट असलेले गोवा मात्र पारतंत्र्यातच होते. गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात पाय ठेवला तेंव्हापासून गोमंतकीय जनतेचे नष्टचर्य सुरू झाले होते. तब्बल साडेचारशे वर्ष पारतंत्र्यात राहिलेल्या गोव्याचे नष्टचर्य १९ डिसेंबर १९६१ रोजी संपले. १९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमन व दीव हा प्रदेश मुक्त झाला. कोकण पासून पेडणेपर्यंत पसरलेली गोव्याची निसर्गरम्य भूमी १९ डिसेंबर १९६१ रोजी भारताशी एकरुप झाली अर्थात १९६१ चे युद्ध हा गोवामुक्ती आंदोलनाचा निर्णायक भाग होता पण गोवा मुक्ती आंदोलनाला खूप मोठा इतिहास आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशातील ५६५ संस्थाने भारतात विलीन झाले पण पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमन, दादरा आणि नगरहवेली या आपल्या वसाहतीतुन जाण्यास स्पष्ट नकार दिला. ते गोव्याचे भारतात विलीनीकरण करण्याच्या बाजूने नव्हते. पंतप्रधान पंडित नेहरु हे पोर्तुगीज वसाहतीशी चांगले संबंध प्रस्थापित करीत होते पण तेथील प्रशासक मात्र त्यांना सहकार्य करीत नव्हते. गोमंतकीय जनताही पोर्तुगीजांच्या अत्याचाराला कंटाळून भारतात विलीन होण्यासाठी भारत सरकारने सहकार्य करावे अशी मागणी करीत होते. पोर्तुगीज गोव्याला भारतात विलीन करण्याच्या विरोधात होते पण जनतेला मात्र भारतात विलीन व्हावे असे वाटत होते. गोमंतकीय जनतेची इच्छा ओळखून पंतप्रधान नेहरू यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून पोर्तुगीजांवर दबाव आणला. शांततेच्या मार्गाने भारत सोडून जाण्याचा संदेश त्यांनी पोर्तुगीजांना दिला पण पोर्तुगीजांनी या संदेशाला जुमानले नाही. शांततेच्या मार्गाने पोर्तुगीज देश सोडून जात नाहीत, वाटाघाटी यशस्वी होत नाहीत हे लक्षात आल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी लष्कराला कारवाईचे आदेश दिले. भारताने लष्करी कारवाई करू नये म्हणून पोर्तुगीजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीज सरकारची जुलूमशाही आणि आंदोलनाला मिळणारा जनतेचा तीव्र प्रतिसाद या पार्श्वभूमीवर नेहरुंनी १७ डिसेंबर १९६१ रोजी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारतीय सैन्य गोव्यात घुसवण्याचा निर्णय घेतला. भारतीय सैन्याने पोर्तुगिजांचा पूर्ण पाडाव करुन १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकवला आणि गोवा मुक्त झाला. साडेचारशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या गोव्यात स्वातंत्र्याची पहाट उगवली. दीव, दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. पोर्तुगिजांच्या गुलामीतून मुक्त होऊन आज गोव्याला तब्बल ६२ वर्ष पूर्ण झाली. गोवा मुक्ती संग्रामाचे हे ६२ वे वर्ष आहे. यानिमित्ताने गोव्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. गोवामुक्ती दिनाच्या गोमंतकीय जनतेला मनापासून शुभेच्छा!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५