वरूड तालुका प्रतिनिधी /
विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असतांना आमदार देवेंद्र भुयार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मोर्शी वरूड तालुक्यातील विविध विषयांवर लक्ष केंद्रित करीत मोर्शी वरूड तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मागण्या प्रस्तावित केल्या आहेत. व या पूर्ण करण्याची विनंती करीत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथे अस्तित्वात असलेल्या लहान MIDC चे विस्तारीकरण करण्यासाठी ५०० हेक्टर जमीन संपादित करून प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला प्रोत्साहित करून मेगा फूड प्रोसेसिंग प्रकल्प मंजूर करावा.
करजगाव, उदापुर, पिंपळखुंटा, डोंगरयावली, तिवसाघाट, गणेशपूर लिंगा, येथील मंजूर सबस्टेशन ची निविदा काढण्यात यावी व मंजूर असलेले १०० केव्ही चे ३०० रोहित्र लवकर बसविण्यात यावे. वरुड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा व तालुक्यातील ईक्लास जागेवर नवीन सोलर योजना कार्यान्वित करण्यात यावी.
बारी समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी रुपलाल महाराज यांच्या नावे स्वतंत्र पांनपिरी महामंडळ स्थापन करून १०० कोटी रुपयांची तरतूद करून बारी समाजातील लोकांना शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,राजकीय, न्याय द्यावा व पाणपिपरी ला राजाश्रय देऊन पानांचे संशोधन करून नवीन वान विकसित करून त्या पानाला जीआय नामांकन देण्यात यावे.व अंजनगाव येथे १० कोटी रुपये देऊन संत शिरोमणी रुपलाल महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात यावे.
भोई समाज, धनगर समाज, पारधी समाज बांधवाना राजमाता अहिल्याबाई होळकर व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने मध्ये वरुड तालुक्यासाठी ३ हजार घरकुल व मोर्शी तालुक्यातील कुटूंबासाठी ३ हजार घरकुल मंजूर करण्यात यावे.
ग्राम पंचायत वर थकीत असलेल्या पाणी पुरवठाच्या बिलात शासनाने ५०% सूट द्यावी व तो भार शासनाने सोसावा. जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या दोन्ही तालुक्यातील स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेवर सोलर पंप व सोलर प्यानल बसविण्यात यावे ज्यामुळे विजेचा भार लोकांवर येणार नाही मोफत पाणी पुरवठा करता येईल.
मोर्शी तालुक्यातील पार्डी स्वतंत्र १२ गाव पाणी पुरवठा योजना तसेच वरुड तालुक्यातील लोणी,पुसला तसेच इतर ११ गावे पाणी पुरवठा योजना मंजूर करावी यासह आदी विकासात्मक विषयावर चर्चा करून संपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याची विनंती करीत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृहामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी केली.