Home अमरावती २१ व्या म.फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुधीर महाजन यांची निवड

२१ व्या म.फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुधीर महाजन यांची निवड

137

 

अमरावती ( वार्ताहर )
दलित,आदिवासी,ओबीसी व बारा बलुतेदार यांच्या न्याय्य हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देणारी अराजकीय संघटना उपेक्षित समाज महासंघाच्या वतीने जिल्हा खुले कारागृह, मोर्शीच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवार दि.28 नोव्हेंबर 2023 रोजी ( महात्मा फुले स्मृती पर्व दिनी ) 21 व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत,ख्यातनाम वक्ते प्राचार्य सुधीर महाजन (प्राचार्य , पोदार इंटरनॅशनल स्कूल, अमरावती ) यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांच्या सत्काराचे दि. 8 नोव्हें.2023 ला पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजन करण्यात आले.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड ( अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ ) प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध लेखक -कवी-अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ),सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध परिचय महासंमेलनाचे उपाध्यक्ष श्री भरतराव खासबागे, कोषाध्यक्ष श्री ओमप्रकाश अंबाडकर,कारागृह अधिक्षक श्री ज्ञानेश्वर खरात,माजी कारागृह अधिक्षक श्री कमलाकर घोंगडे, श्री भास्करराव कावलकर, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे होते.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून विनम्र वंदन करण्यात आले.
21 व्या राज्यसरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य श्री सुधीर महाजन सरांचा शाल, पुष्पगुच्छ,प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित ” विद्रोही महात्मा ” व प्रा.अरुण बुंदेले लिखित “अभंग तरंग”व ” निखारा ” हे काव्य संग्रह भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्राचार्य श्री सुधीर महाजन म्हणाले की ,” भारताला धर्मांधतेपासून फुले -शाहू – आंबेडकर यांचे सत्यशोधकीय विचारच वाचवू शकतात.साहित्य हे समाजाचा आरसा असून महामानवांची विचारधारा तळागाळापर्यंत पोचविण्याची गरज आहे.महात्मा फुलेंच्या साहित्याने सकल विश्वातील मानव जातीला एका सूत्रात बांधण्याचे कार्य केले.”असे . विचार व्यक्त केले.
प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातून नवोदितांना विचारपीठ उपलब्ध होणार आहे. मागील २० सत्यशोधक साहित्य संमेलनातून हे कार्य संमेलनाचे संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी केले आहे. या २१ व्या सत्यशोधक साहित्य संमेलनातून महात्मा फुलेंच्या साहित्यावर विचारमंथन होऊन परिवर्तनाची चळवळ ही गतिशील होणार आहे. प्राचार्य सुधीर महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणातील पुरोगामी विचार प्रेरक ठरणार आहेत. “असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, ” महात्मा फुलेंची क्रांतिकारी साहित्य संपदा म्हणजे माणसाला माणूस घडविणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचे मूल्य असून सकल मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे.त्यांच्या साहित्यावर महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिसंवादातून व प्राचार्य सुधीर महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणातून समीक्षा केली जाणार आहे.” असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.कल्याणी भास्करराव कावलकर तर आभार श्री ओमप्रकाश अंबाडकर यांनी मानले.
याप्रसंगी माळीसमाज महासंघ सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध महासंघ तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील डॉ.आशीष खुळे,श्री भूषण पथे, प्रजा दर्जी,वैशाली बुंदेले तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here