दि.५ नोव्हेंबर २०२३ च्या पहाटे काळाने निशिकांत मडघे या माझ्या धाकट्या भावाला,माझ्या मित्राला आपल्या कुशीत सामावून घेतले,कायमचे.
प्रिय निशू, २४ तास मृत्यूशी तुझी झुंज देत असताना किती विचार चालले असतील तुझ्या मनात? किती वेदना होत असतील रे तुला? ज्या आईचा शब्द तू फुलासारखा झेलत होता, दिवस रात्र तिच्या काळजीने झटत होता, तिचा निरोप घेताना किती प्रचंड तांडव करत असेल रे तुझं मन ? तिच्या भविष्यात तू नसणार ह्या जाणीवेने किती त्रागा झाला असेल तुझा ? जगाला तुझ्या ह्या भावना, तुझ्या वेदना कधी कळतील का? मित्रांसाठी कायम झटणारा, कोणीही गरजू रित्या हाताने तू परत जाऊ दिला नाहीस. तुझ्या निर्भिड स्वभावाच्या मागचा तुझा हा सवेदनशील चेहरा कधी उघड होईल का?
पूर्व जन्माचे भाग्य म्हणावे असा भाऊ तू, माणूसकीला नाही तोड अशी निर्मळ वेडी तुझी माया. कुठल्याही मातेला प्रत्येक जन्मी तुझ्याच मातृसेवेचा लोभ व्हावा अशी तुझी रे मातृभक्ती. एक मित्र तू. एका नजरेत सर्व संभाषण संपवणारी ती भेदक नजर तुझी.असा कसा रे तू नजर चोरून लुप्त होवू शकतोस? एका क्षणात? किती रे घाई ही? ही घाई तुझी की परमेश्वराची? त्याला पण कदाचित तुला भेटायची घाई तर झाली नसणार?
तुझा तो – भाऊ घाबरू नकोस, मी येतो लगेच- चा एक प्रामाणिक आधार, तुझ्या धेय्याची किनार, आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा तो सोबती भाऊ आत्ता नसणार.. नेहमी साठी.
तू थोडं थांबायला हव होतं- तुझ्या साठी नाही, तर आमच्या सारख्या कधी पोट न भरणाऱ्या स्वार्थी लोकांसाठी तरी. तुला पूर्ण समजण्यासाठी अजून थोडा वेळ हवा होता.आम्हा सर्वांनच!
फार मोठी जबाबदारी , पुत्रधर्माचा नवीन मापदंड, मैत्रीची नात्यांची नवीन परिभाषा मांडून आम्हाला सोडून अचानक तुझे जाणे प्रचंड न भरणारीं कायमची पोकळी निर्माण करून गेली आहे ह्याची तुला जाणीव असेल का?
असो! तुझ्या तडकाफडकी वृत्तीची मला नेहमीच तक्रार होती आणि ती आता तर संपूर्ण आयुष्य भर राहणार आहे.
श्रीकांत मडघे
अमरावती .