चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वार्षिक नियतकालिक अंक संपादक मंडळातर्फे ‘शरभंग वार्षिक नियतकालिक अंक प्रकाशन समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी. पाटील, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे व समन्वयक पी.एस.पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरभंग वार्षिक नियतकालिक अंकाचे संपादक डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले. यावेळी चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.आर.ओ.वाघ यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्यातील उणीवा दूर सारून विविध कलागुणांचा विकास करायला हवा. वाचन व लेखन या माध्यमातून महाविद्यालयात उपलब्ध व्यासपीठाचा पुरेपूर फायदा करून घेतला तरच आपले व्यक्तिमत्व विकसित होईल. यावेळी त्यांनी ‘शरभंग’ नियतकालिकातील लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘महाविद्यालयीन नियतकालिक हा महाविद्यालयाचा आरसा असून त्यामध्ये लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असते.विचारांचे प्रकटीकरण करण्यासाठी हे महत्वाचे व्यासपीठ असते. विद्यार्थ्यांनी सतत वाचन केल्यास लेखनाची प्रेरणा मिळते व त्यातूनच आपले वैचारिक व्यक्तिमत्व घडायला मदत होते. म्हणून शरभंग या नियतकालिकासारख्या व्यासपीठाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायला हवा’. याप्रसंगी त्यांनी शरभंग या वार्षिक नियतकालिक अंकास मिळालेल्या पारितोषिकांविषयी माहिती करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.बी.पाटील यांनी केले तर आभार डॉ.के.एस. भावसार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती सदस्य तसेच डॉ.ए.एच.साळुंखे, जी.बी.बडगुजर इत्यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.