Home यवतमाळ शहरवासियांनो, वाहतुक सिग्नलचे नियम पाळा व अपघात टाळा… उपविभागीय अधिकारी एकनाथ...

शहरवासियांनो, वाहतुक सिग्नलचे नियम पाळा व अपघात टाळा… उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांचे आवाहन…!! भारती मैद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत वाहतूक सिग्नलचा लोकार्पण सोहळा उत्साहात..!!

137

बळवंत मनवर/पुसद

पुसद शहर व परिसरात वाहनांची संख्या वाढली असल्याने वाहतुकीची समस्या मोठी गंभीर आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांना दुचाकी, चारचाकी वाहने चालविण्यास देऊ नयेत. सोबत सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे सांगत शहरवासियांनो, वाहतूक सिग्नलचे नियम पाळा व अपघात टाळा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी येथे सोमवारी केले. तसेच पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भारती मैद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैद यांच्या पुढाकारातून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व बस स्थानक चौकात नागरिकांसाठी स्वयंचालित सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. ही पुसद शहरासाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे सांगून त्यांनी याप्रसंगी शरद मैद यांना विशेष धन्यवादही दिले.
भारती मैद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक व बस स्थानक चौकात स्वयंचलित सिग्नलचा लोकार्पण सोहळा सोमवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून एसडीओ एकनाथ काळबांडे बोलत होते.
याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पंकज अतुलकर, शहरचे ठाणेदार उमेश बेसरकर, वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचणकर, वाहतूक शाखेचे ठाणेदार ज्ञानेश्वर चव्हाण, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार, शिवसेना (शिंदे गट ) जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार, भाजपाचे गट नेते निखिल चिद्दरवार,
पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुबेवार, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भारती मैद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैद प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पंकज अतुलकर यांच्या हस्ते बटण दाबून वाहतुकीच्या स्वयंचलित सिग्नलचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ पंकज अतुलकर यांनी, शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैद यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांच्यातर्फे शरद मैद यांचे विशेष आभार व्यक्त केले.
वाहतूक शाखेचे ठाणेदार ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शरद मैद यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव करून शरद मैद हे खरे सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगून समाजात काहीजण मात्र ‘काड्या’ कर्ते असल्याचे सांगत त्यांनी शहरवासियांना कानपिचक्याही दिल्या.
या सिग्नल लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक करताना पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैद यांनी भारती मैद नागरी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक व बस स्थानक चौक आदी दोन चौकात जास्त गर्दी असल्याने स्वयंचलित सिग्नलची सोय करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी वाहतुक सिग्नलचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा आशावादही शरद मैद यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संचालन मनिष अनंतवार यांनी तर आभार पतसंस्थेचे उपाध्यक्ष भारत जाधव यांनी मानले.
यावेळी पुसद अर्बन बँक व भारती मैद पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here