धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगाव : येथील मोठा माळीवाडा समाज सभागृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धरणगाव तालुक्याच्या वतीने “ओबीसी आरक्षण बचाव” या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी समता परिषदेचे विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, विभागीय महिला संघटक सौ.निवेदिता ताठे, तालुकाध्यक्ष धनराज माळी आदींसह सर्व ओबीसी समाजाचे अध्यक्ष, प्रतिनिधीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे उपाध्यक्ष व्ही टी माळी यांनी तर परिचय सचिव गोपाल माळी यांनी करून दिला.
याबैठकीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक व उपस्थित ओबीसी बांधवांनी हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी पक्षभेद, जातीभेद विसरून ओबीसी बहुजन म्हणुन आपण एकत्र येत एक मोठा लढा उभा केला पाहिजे. सकल ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न काही लोक करीत असून ओबीसींचे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्यासाठी दि.२०, शुक्रवारी धरणगावात समता परिषदेने या महामेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. जेणेकरून ओबीसी आरक्षणात कोणत्याही जातींचा समावेश केला जाणार नाही. कारण १९३१ च्या जनगणनेनुसार प्रत्यक्ष ओबीसी ५२ टक्के समाज असताना सुद्धा त्यांना १९ टक्केच आरक्षण मिळाले आहे. या आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात मराठा बांधवांना आरक्षण नक्कीच दिले पाहिजे पण त्यासाठी वेगळी तरतूद करावी. परंतु ही तरतूद करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. १८ पगड जाती असलेला ओबीसी बांधवाला आरक्षणापासून वंचित राहणार नाही म्हणून आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे. व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर ओबीसी आरक्षण लढा तीव्र केला पाहिजे आणि यासाठी सर्वच ओबीसींनी तयार झाले पाहिजे. तसेच, जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मोठी चळवळ उभी करावी लागेल व त्यासाठी सर्व ओबीसी संघटना व बहुजन समाज संघटना यांची साथ भुजबळ यांच्या पाठीमागे असली तर निश्चितपणाने ओबीसी आरक्षण अबाधित राहील असे मनोगत उपस्थितांनी केले. त्याचप्रमाणे राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात स्थान द्यावे अशी मागणी होत असताना आणि त्यास आक्षेप घेतल्यावरून राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगनराव भुजबळ यांना लक्ष्य केले जात असताना आता ओबीसींचा राष्ट्रीय बुलंद आवाज असलेले छगनराव भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मैदानात उतरली आहे. दरम्यान दि.२० रोजी “ओबीसी आरक्षण अधिकार मेळाव्यास” उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्यासह सर्व ओबीसी बांधवांनी केले आहे. या बैठकीत शहरातील सर्व ओबीसी अंतर्गत सर्व समाजाचे अध्यक्ष व विश्वस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष सुभाष महाजन यांनी तर आभार कार्याध्यक्ष विनायक माळी यांनी मानले.