Home पुणे “बिहाईंड द वुड्स” लोकनृत्य महोत्सवाचे 14 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यात आयोजन

“बिहाईंड द वुड्स” लोकनृत्य महोत्सवाचे 14 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यात आयोजन

187

🔹तीन वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती, परंपरा, लोकनृत्य एकच व्यासपीठावर पाहण्याची संधी

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.12सप्टेंबर):- कलिंगा कला केंद्र ट्रस्ट आणि ओडिशा सरकारच्या (सांस्कृतिक,भाषा आणि साहित्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑक्टोबर रोजी येरवडा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता “बिहाइंड द वुड्स” – या लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजिका आणि ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष, डॉ. ममता मिश्रा, सचिव संदीप राणा आणि सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक करुणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ट्रस्टचे सल्लागार लोकनाथ सारंगी, सभासद निक्षिता सारंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ओडिशा येथील लोकप्रिय पार्श्वगायिका, आंतरराष्ट्रीय कलाकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेती अनिंदिता दास यांचे लोकगीत गायन, ओडिशातील कपोई छाऊ नृत्य प्रतिष्ठान व मयूरभंज येथील कलाकार छाऊ नृत्य, गंजम येथील उपेंद्रभंजा लोक नृत्य परिषद चे कलाकार बाघा नृत्य, ओडिशाचे लोकप्रिय संभलपुरी लोकनृत्य प्राची पाणिग्रही आणि ग्रूप सादर करणार आहेत.

पश्चिम बंगालची लोकगीते या मधे भटियाली, गोंभिरा, भवैया; जुमुर आणि भक्ती लोकगीत बाउल पिपल रे, सागरिका दास, इप्सिता मोहंती आणि इप्सा मोहपात्रा सादर करणार असून नृत्य प्रकारामध्ये ओडिशी- अर्चना बसू, गौडीया- पौलोमी चटर्जी, उदय शंकर शैली-अन्वेषा सिंग आणि कथ्थक – सयानी नंदा सादर करणार आहेत.

पुण्यातील ऋतुरंग कल्चरल ग्रुपच्या करुणा पाटील महाराष्ट्रातील सण परंपरे वर आधारित ‘संस्कृती दर्शन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या मधे स्थानिक कलाकार नृत्यातून आषाढी एकादशी- विठ्ठल विठ्ठल, श्रावणातील मंगळा गौर आणि नारळी पौर्णिमा- कोळी नृत्य, गणेशोत्सव, घटस्थापना- आईचा जोगवा ही सण परंपरा सादर करणार असून महाराष्ट्रातील डहाणू येथील आदिवासी समूह प्रसिद्ध तारपा नृत्यातून त्यांची संस्कृती आणि परंपरा सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओडिशाच्या आर.जे. स्वाती करणार आहेत. ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या तीन वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृती, परंपरा व लोकनृत्य एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी पुणेकरांना या कार्यक्रमातून मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here