Home गडचिरोली गडचिरोलीत भूदान आणि वनहक्क जमीन घोटाळा? 🔹 सैनिक समाज पार्टी करणार...

गडचिरोलीत भूदान आणि वनहक्क जमीन घोटाळा? 🔹 सैनिक समाज पार्टी करणार घोटाळेबाजांंचा शोध. 🔹त्यात बडे मासे आणि भुमाफिया अडकणार काय ❓

170

 

गडचिरोली / प्रतिनिधी दि. 28/9/ 2023 :- वनहक्काने वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या जमिनीवर ताबा मिळवून विक्री केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या सुनावणीनंतर तत्कालीन तलाठी आणि वनरक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे हे निलंबन मागे घेत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी नव्याने चौकशीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी भूमाफिया, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयातील काही अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली शहरालगत मुरखळा (नवेगांव) हद्दीतील १२ अतिक्रमणधारक नागरिकांना सर्व्हे क्रमांक १०८ व १८९/२ मधील ८ हेक्टर जागेचा वनपट्टा देण्यात आला होता. सध्याच्या स्थितीत प्लाटच्या बाजार भावाप्रमाणे तब्बल ५० कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या या जमिनीवर शहरातील काही कथित भूविकास माफियांनी अल्पावधीतच पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी पट्टेधारक नागरिकांची अनेक आमिष दाखवून दिशाभूल करून ताबा मिळविला आणि त्यावर प्लॉट पाडून विक्री सुरू केली होती. दोन वर्षांपासून हा प्रकार चालू होता. ही बाब लक्षात येताच दीड वर्षांपूर्वी वनविभागाने या जमिनीचा पंचनामा करून पट्टेधारकांचे बयान नोंदविले व अहवाल तयार करून कारवाईसाठी महसूल विभागासोबत पत्रव्यवहार केला होता. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.
दरम्यानच्या काळात वनविभागाने गडचिरोली तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांसोबत पुन्हा दोनवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते . दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाची झोप उघडली आणि प्रशासनाने संबंधित पट्टेधारकांना बोलवून त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले व पट्टे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. पावसाळी अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयातील काही पोटभरू कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन वनरक्षक व तलाठी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.परंतु खरा प्रकार त्यांच्या लक्षात येताच हे निलंबन तात्काळ रद्दही करण्यात आले. सोबतच या प्रकरणाची नव्याने चौकशीचे निर्देश सुध्दा जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील भूमाफिया आणि दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याविषयी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला असून कडक कारवाईचे संकेत दिले असल्याचे सांगितले.
वनविभागाचा अहवाल महत्त्वाचा असुन
वनपट्टा देण्यात आलेली ही जमीन महसूल – वनेमध्ये येत असल्याने त्याची सर्वाधिक जबाबदारी महसूल विभगाची आहे. तरीसुद्धा दीड वर्षांपासून वनविभाग सातत्याने जमीन विक्री प्रकरणात महसूल विभागाला स्मरण करून देत होते. त्यांच्या अहवालात पट्टेधारकांनी दिलेल्या बयानावरून पुंजीराम राऊत, चेतन अंबादे, विनय बांबोळे, धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी आणि अन्य ११ जणांनी या जमिनीची खरेदी व विक्री केल्याचे नमूद आहे. जेव्हा की ही जमीन केवळ शेतीसाठी देण्यात आली होती. त्या शेतीतून उत्पन्न काढून उपजिविका करण्यासाठी शासनाने ती शेतकऱ्यांना दिली होती.
मात्र, या लोकांनी थेट विक्रीचा सपाटा लावला होता, असे अहवालात पट्टेधारकांच्या बयानासह नमूद आहे. परंतु उपविभागीय कार्यालयातील एका अधिकाऱ्याने हे वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून दडवून ठेवले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी यात पराकोटीने लक्ष घातल्याने दोषींवर लवकरच फौजदारी गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी तर अशा भूमाफियांवर ‘मोक्का’ देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे अशी कारवाई गडचिरोलीत देखील करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळी दरम्यान मिळालेल्या व भूदानयज्ञ समितीने भुमीहिनांना दिलेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात परवानगी कोणी दिली. मात्र भूदान चा शेरा कोटगल येथील बॅरेजमध्ये दुसऱ्याच्या शेतीवर वर्ग करून प्लाट पाडून एन. ए. टी. पी. करून खुलेआम विक्री केली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून परवानगी देण्यात आली असावी अशी शंका वर्तविण्यात येत असुन अशा प्रकारच्या खरेदी विक्री संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पराकोटीने लक्ष वेधण्याचा नितांत गरज आहे. गडचिरोली शहरालगत असलेल्या अशा प्रकरणाचा सैनिक समाज पार्टीचे वतीने शोध घेऊन शहरात असलेल्या भूमाफिया , अधिकारी व संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here