पुणे, ता. १० ः बार्टीतील गैरव्यवहार आणि निबंधक इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, याकरिता सामाजिक कार्यकर्ते गौतम भंडारे आणि कविता गाडगे तसेच सहकारी ता. ११ सप्टेंबरला मुंडण आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राज्यस्तरातून अनेकांनी पाठिंबा दिला असून कार्यवाही न करणाऱ्या सरकारच्या विरोधात रोष दिसून येत आहे.
बार्टीतील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले असून त्याविरोधात गौतम भंडारे, तक्षशिला महिला मंडळाच्या कविता गाडगे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापासून ते आंदोलन करीत असून अधिवेशनामध्ये त्यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यांनी येथील निबंधक अस्वार यांच्या विभागीय चौकशीला तत्काळ मंजुरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आंदोलन आत्मदहन आंदोलन करण्यात येणार होते. त्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत गौतम भंडारे,कविता गाडगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची बैठक बार्टीच्या पुणे येथील कार्यालयात घेतली होती. तसेच चौकशीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, बार्टीचे महासंचालकांनी दिलेले आश्वासन फूस ठरल्याने ११ सप्टेंबरला मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून सामाजिक न्याय समन्वय समितीचे राज्यअध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर मोटघरे, आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर नंदागवळी, पुंडलिक घ्यार यांच्यासह शेकडो संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.