Home महाराष्ट्र गौरव आणि कृतज्ञतःही- सत्यपालची सत्यवाणी

गौरव आणि कृतज्ञतःही- सत्यपालची सत्यवाणी

141

सत्यपाल महाराज सप्त खंजिरीवाले महाराष्ट्रात माहित नाही असे गाव-खेडे सापडणार नाही. तुकडोजी महाराजांची खंजिरी सत्यपाल महाराजांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कीर्तनाच्या माध्यमातून जनामनात पोहोचवली. एकाच वेळी सात खंजऱ्या वाजविणारे तरुण सत्यपाल महाराज या करामतीने महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावले. काल एका प्रसिद्ध मराठी दूरचित्र वाहिनीने सत्यपाल महाराजांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव तर केलाच समाजाच्या वतीने एकप्रकारे कृतज्ञताही व्यक्त झाली. संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हरेकाची कीर्तनाची एकमेवाव्दितीय शैली. तशीच सत्यपाल महाराज यांची सुद्धा अनोखी अशी कीर्तन शैली, दोन्ही हातात तीन-तीन अशा सहा,दोन पायांच्या गुडघ्यावर एकेक म्हणजे दोन, एकाचवेळी अशा सात-आठ खंजऱ्या वाजवणे, कीर्तनात यथोचित तुकडोजी महाराजांची भजने गाऊन, ग्रामगीता,लहर की बरखा मधील ओव्यांचे दाखले देत, कीर्तनाचा आशय सकस करणे, अगदी अफलातून, अचाट गुणवत्ता.

लोकांना भावणारी शैली.समोर बसलेल्या लहान मुलांमधून एखाद्या मुलाला मंचावर बोलवून त्याचे सामान्य ज्ञान, शिक्षण, शाळा, वर्ग विचारुन त्याला एखादे पुस्तक,मासिक भेट देतात;तर एखाद्या मायमाऊलीला बोलावून साडी पुस्तक भेट देतात; एखाद्या पुरुषाला शेती मालाचे भाव विचारत संवाद साधून शिक्षक वर्गाध्यापनात जसा पोरांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन शिकवण्यात जिवंतपणा आणतात, तसेच सत्यपाल महाराजांचे कीर्तन. खंजिरी सोबतच सत्यपाल महाराजांनी कीर्तनातून कबीर, तुकाराम, नामदेव, गोरोबा, तुकोबा, संताजी, सावता, सेनान्हावी, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज इत्यादी संतांना एका सूत्रात गुंफले. सुफी, वारकरी संत परंपरेचा विचार सप्त खंजिरीच्या मधूर बोलामधून माणसामाणसांत निनादू लागला. संतांच्या जोडीला लोकायत, जैन, बुद्ध, लिंगायत, महानुभाव पंथीय महामानवांचे समाजोन्नतीचे कार्य सांगत, फुले शाहू आंबेडकरी विचारांची विवेकी पेरणी सत्यपाल महाराजांच्या कीर्तनातून होत असल्याने कीर्तनाचा विषय आधुनिक राष्ट्रीय कीर्तन असा अलगदपणे होऊन जातो.

सत्यपाल महाराज हे वऱ्हाडातील अकोट तालुक्यातील वास्तव्य असलेले. या परिसराला सामाजिक सांस्कृतिक संघर्षाची अफाट परंपरा लाभलेली आहे. अकोटला खेटून असलेल्या खामगाव बुलढाणा परिसरात एकेकाळी शेतकरी आंदोलन शिखरावर पोहचले होते. सत्यशोधक आनंदस्वामी या ब्राम्हणेतर नेत्यानी सावकरशाही विरुद्ध दंड थोपटून या परिसरातील बेदरकार सावकारशाहीला सळो की पळो करून सोडले, आनंदस्वामी आणि त्यांचे सहकारी लाल रंगाचा वेष धारण करुन, एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक कार्य असल्याच्या विश्वासाने शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध अहोरात्र झटत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लढणारे लाल डगलेवाले बाबा म्हणून आनंदस्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दरारा होता.

सत्यशोधक चळवळ, ब्राम्हणेतर चळवळीचा वऱ्हाडातील वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा परिसरात मोठाच दबदबा होता. वर्धा, अमरावती येथील सत्यशोधक समाजाची अधिवेशने, ब्राम्हणेतर पक्षाच्या परिषदा, शेतकरी परिषदा, शिक्षण परिषदा, महिला परिषद यामुळे ब्राम्हणेतर समाजाचे उत्तम प्रबोधन झाले. सत्यशोधक समाजाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ थोर नेतृत्व खासकरून विदर्भात येऊन पराकाष्ठा करत, परिणामतः विदर्भात सत्यशोधक चळवळीला जनाधार मिळत गेला. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तर वऱ्हाडातील शैक्षणिक कृषिविषयक प्रगतीच्या वाटा विकसित होत गेल्या. संत गाडगेबाबा, आडकोजी महाराज,तुकडोजी महाराज, गणपती महाराज आणि अठरापगड जातीतील त्यांचा मोठा अनुयायीवर्ग यांच्या माध्यमातून जनप्रबोधनाचा प्रवाह मोठाचमोठा होत गेला.

जनमानसात रुढ लोककला आणि लोकसंगिताचा सत्यशोधक चळवळतील मुखंडांनी वेध घेऊन मोठ्या खुबीने त्याचा वापरही केला. जलसा हा प्रकार सत्यशोधकांनी आपलं बलस्थान बनवलं. महाराष्ट्रात नायगावकर यांचा सत्यशोधक जलसा प्रख्यात होता, तसाच विदर्भात हरीचा जलसा; सत्यशोधक ब्राम्हणेतर प्रबोधन चळवळीचे महत्त्वाचे अंग होते. तुकडोजी महाराजांनी खंजिरी आणि वाद्यासह कीर्तन, या माध्यमातून गुरूदेव सेवा मंडळाचे जाळेच विणून टाकले. सत्यशोधक-ब्राम्हणेतर, संतमंडळी आणि लोकसंगित लोककलेच्या निरंतर लढ्यातून समतावादी, मानवतावादी विचार विदर्भाच्या मातीत रुजत होता. पुरोगामी मानसिकता घडण्याची ही परंपरा अखंडपणे चालू राहिली.

वऱ्हाडची हीच सांस्कृतिक परंपरा सत्यपाल महाराज समृद्ध, संपन्न करत आले आहेत. गेली पाच-साडेपाच दशके सत्यपाल महाराज लोकांच्या हृदयात आतल्या कप्प्यात बसलेले आहेत. ओबीसी-भटकेविमुक्त-दलित-आदिवासी-अल्पसंख्यांक इ. सामाजिक संघटनांच्या कार्याची महती ध्यानात घेऊन सत्यपाल महाराज सामाजिक संघटनांशी सौहार्दाचे नाते जपतात. सुमारे पाच वर्षापूर्वी नागपूर येथे डॉ. आ. ह. साळुंखे सर यांचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सत्यपाल महाराज आवर्जून उपस्थित होते. अमृत महोत्सवात कीर्तनकार नव्हे तर, वक्ता म्हणून उपस्थित होते. अर्थातच, त्यांच्या प्रबोधनाची दिशा यावरून ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. दारुबंदी, व्यसनाधीनता, बालविवाह, सतीप्रथा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, धर्मांधता, जातीभेद, लिंगभेद, शिक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गलथान राजकारण, भाऊबंदकी, ग्रामविकास, ग्रामगीता, सरकारी योजना आदींवर त्यांच्या कीर्तनाचा झोत असतो. तुकडोजी महाराजांच्या भजनांच्या संदर्भासह गायन आणि सप्तखंजरी वादन यातून लोकरंजन आणि प्रबोधन दोन्हीही प्रभावीपणे अलगद होते.

लोकांच्या मनाचा ठाव घेणारे, लोकांच्या जीवनातील सुखदुखाशी तादात्म्य पावणारे सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाला अलोट गर्दी असते. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीचा अनुभव सांगावासाच आहे. आजनसरा या गावी सत्यपाल महाराजांचे कीर्तन होते. बहुधा भोजाजी महाराज पुण्यतिथीचे ते पर्व असावे. उन्हाळ्यातील दिवस होते. त्याकाळी आजच्या प्रमाणे दळणवळणाची साधने नव्हती. रस्तेही ओबडधोबड तरी कीर्तनाला लोकांची अफाट गर्दी. लोक सायकल, बैलगाडी, पायी असे अंधाऱ्या वाटेने, जमेल त्याप्रकारे कीर्तनाला जात. माणसंबाया, मुलीमुलं, म्हातारे-तरुण, नेटके-फाटके,सत्यपाल महाराजांचे चाहते. पंचक्रोशीतील लोक सत्यपालची सत्यवाणी ऐकण्यासाठी येत. लोकप्रियतेबाबत आजही तेच चित्र आहे. सत्यपाल महाराज आणि त्यांचे सहकारी अथकपणे हजारो मैलाचा प्रवास करून लोक चेतना जागी करत आहेत. सत्यपाल महाराज आता एकटे नाहीत, त्यांच्यासारखेच, त्याच शैलीत कीर्तन करणारे, एकापेक्षा एक सरस. सत्यपाल महाराजांच्या नावातील ‘पाल’ (पवनपाल,संदीपपाल,उदयपाल वगैरे)हा प्रत्यय आपल्या नावाशी लावून सत्यपाल महाराजांचा प्रबोधनाचा घेतलेला वसा आणि वारसा चालवतात. संस्कार शिबिरातून बालकलाकार तयार करुन त्यांना कीर्तनाचे प्रशिक्षण देणे, कीर्तनकारांची नवपिढी घडवणे, हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे.सत्यपाल महाराजांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने प्रबोधन चळवळीचा गौरव होय, कृतज्ञता होय.

✒️अनुज हुलके(मो:-9823883541)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here