Home अमरावती कै. डॉ. दिलीप मालखेडे- एक आदर्श व अष्टपैल कुलगुरु

कै. डॉ. दिलीप मालखेडे- एक आदर्श व अष्टपैल कुलगुरु

120

लोकाभिमुख कार्य करून विद्यापीठाचा लौकिक वाढविणारे, विद्यापीठाच्या परिसरामध्ये सात अभ्यासिका काढून विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची समस्या नष्ट करणारे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा लाभ देणारे, आंतरिक तळमळीतून विद्यापीठाच्या प्रत्येक कार्यासाठी सतत झटणारे,केवळ तीन महिन्यातच विद्यापीठाच्या विविध विभागात आमूलाग्र व सकारात्मक बदल घडवून आणणारे, विद्यार्थी व विद्यापीठाचे निर्णय ताबडतोब घेणारे, उपक्रमशील व रचनात्मक कार्य करणारे,समाजाविषयी तळमळ व जागृत असणारे,स्पर्धा परीक्षा कार्यशाळा विद्यापीठात व विविध महाविद्यालयात आयोजित करून स्पर्धा परीक्षेची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे,विकासाची दूरदृष्टी असणारे, कर्तृत्वावर मनस्वी श्रद्धा ठेवणारे, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात प्रभावीपणे होण्यासाठी अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम,यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा आयोजित करून नवशैक्षणिक धोरण शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे,सामान्य विद्यार्थी व सामान्य माणूस यांच्यासाठी स्वतःचे चंदेरी दालन नेहमीच उघडे ठेवणारे,विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आलेख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे आदरणीय आदर्श व अष्टपैलू कुलगुरू कै.डॉ.दिलीप नामदेवराव मालखेडे यांनात्यांच्या ५७ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आदर्श कुलगुरू म्हणून नावारूपास येत असतानाच कॅन्सरने आप्तस्वकीयांसोबतच हजारो स्नेहिजणांना दि.२८ जानेवारी २०२३ ला प्रभात समयी सोडून पंचतत्त्वात विलिन झाले तेव्हा साहेबांचे संपूर्ण कुटुंब व विद्यापीठातील सर्व सहकारी नि कुलगुरू साहेबांवर प्रेम करणारे हजारो विद्यार्थी दुःखसागरात बुडाले. साहेबांचे जन्मगाव टाकरखेडा संभू, जि.अमरावती आणि मूळ गाव सातपुड्याजवळ असलेले करजगाव (बहिरम) सुद्धा हळहळले.टाकरखेडा संभू ,जि. अमरावती येथे श्री राजूभाऊ विरुळकर या मामांच्या गावी जन्म घेऊन करजगाव (बहिरम) या मूळ ग्रामात प्राथमिक व माध्यामिक शिक्षण पूर्ण केले.करजगाव (बहिरम ) येथील आदर्श शिक्षक श्री नामदेवराव मारोतराव मालखेडे आणि आदर्श गृहिणी सौ.वेणुताई नामदेवराव मालखेडे या मातापित्यांच्या पोटी दि. २७ ऑगस्ट १९६६ ला एक गोंडस बाळ जन्मास आले. त्याचे नाव ठेवण्यात आले दिलीप.

मातापित्यांच्या सुसंस्कारातून दिलीप बाळ घडत गेले कारण वडील श्री नामदेवराव यांनी फक्त वर्गातील विद्यार्थीच घडविले नाहीत तर मुलगा दिलीप आणि लता,वंदना,बबिता या तीन मुली या सर्वांवरच सुसंस्कार करून त्यांना उच्च शिक्षित बनविले. वडील श्री नामदेवराव जेव्हा नांदगाव पेठ येथून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले तेव्हा तेथील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांना जे प्रेम दिले ते बघून बालपणी कुलगुरू साहेबांचे व्यक्तिमत्व पुढे कसे घडत गेले हे लक्षात आले. इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ( COEP, PUNE ) प्रोफेसर असताना,कुलगुरू पदावर असताना,विद्यार्थ्यांच्या हितासाठी कै.डॉ.दिलीप मालखेडे यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले या सर्वांचे बिजारोपण त्यांच्यावर बालपणी आई – वडिलांनी केलेल्या सुसंस्कारात दडलेले होते, हे लक्षात येते.

आई-वडिलांप्रमाणेच सौ.पद्मा रामरावजी मोहोकर,श्रीमती सुमन मालखेडे,सौ.नलिनी ज्ञानेश्वरराव तायडे,सौ.शारदा दत्तोपंत टाले या मावशांनीही लहानपणी साहेबांवर सुसंस्कार केले,त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले.कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे साहेबांच्या सौ.लताताई बाळकृष्ण पाचखंडे ,सौ.वंदनाताई संजय बरडे व सौ.बबिताताई पुंडलिकराव देऊळकर या तीन बहिणी व जावाई उच्च शिक्षित असून नागपूर येथे आपली सेवा देत आहेत.मुलगा श्री ऋषिकेश हा मास कम्युनिकेशन मध्ये पी.जी.असून तो पुणे येथे कंपनीत मॅनेजर आहे तर स्नुषा सौ.मधुरा ही B.E.असून पुणे येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.मुलगी कु.अरुंधती ही गुवाहाटी येथे आय.आय.टी.मध्ये शिक्षण घेत आहे.कुलगुरू साहेबांच्या धर्मपत्नी श्रीमती डॉ.दीपालीताई रसायनशास्त्र या विषयात M.Sc. ,Ph.D.असून पुणे विद्यापीठात रसायनशास्त्राच्या
प्रोफेसर आहेत.

 टाकरखेडा संभू येथील ( ह. मु.अमरावती )त्यांचे तीनही मामा स्वक्षेत्रात कार्यरत आहेत.यामध्ये समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री सुधाकरराव विरूळकर दलित मित्र बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे सचिव असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.श्री राजूभाऊ
विरूळकर हे जिल्हा परिषद शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून असून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत व श्री बाबुराव हे आदर्श शेतकरी आहेत .

” प्रचंड बुद्धीची ।
गरुड भरारी ॥
शिक्षणाची वारी ।
जीवनात ॥

कुलगुरू साहेब शासकीय इंजीनियरिंग कॉलेज,अमरावती येथे मेकॅनिकल मध्ये B.E. झाले.मुंबई I.I.T.मध्ये M.E. करताना केलेल्या संशोधनातून Ph.D.झाले.चंद्रपूर येथे पावर स्टेशन( M.S.E.B.) मध्ये इंजिनिअर म्हणून रुजू झाले. अमरावतीतील पॉलीटेक्निक मध्ये प्राध्यापक होते.औरंगाबादच्या बजाज ऑटो मध्ये इंजिनिअर होते असा नोकरीचा प्रवास करीत असताना अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्था (A.I.C.T.E.) नवी दिल्ली येथे सल्लागार पदावर आठ वर्षे कार्यरत असताना पूर्ण भारतातील तंत्र शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी हिताचे त्यांचे निर्णय मार्गदर्शक ठरले.

भारतात व भारताबाहेर उच्च शिक्षण घेऊन भारतातील ज्या मुलं-मुली भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये जाऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये विविध उच्च पदावर कार्यरत आहेत त्या भारतातील सर्व उच्च शिक्षित मुला-मुलींचे शैक्षणिक परिचय पत्र(बायोडाटा) एकत्र करून त्याचे पुस्तक रूपात प्रकाशित करण्याचा महोदय त्यांनी त्यांचे मामा श्री सुधाकरराव विरूळकर यांच्याजवळ व्यक्त केला होता, जेणेकरून भारतातील जे विद्यार्थी आहेत त्यांना ते बायोडाटा बघून तसे उच्चशिक्षित होण्याची प्रेरणा निर्माण होईल परंतु त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे दि.११ सप्टेंबर २०२१ ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.एक वर्ष चार महिने आठ दिवस कुलगुरुपद भूषवून दि.२८ जानेवारी २०२३ ला प्रभात समयी साहेब अनंतात विलीन झाले.विद्यापीठाचा व विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी त्यांना दीड वर्षही मिळाले नाही परंतु या इतक्या कमी कार्यकाळात त्यांनी विद्यापीठाच्या हिताचे व विद्यार्थ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले व कार्य केले ते अनमोल आहेत असेच म्हणावे लागेल.कुलगुरूपद भूषवल्यामुळे त्यांच्या करजगावचे व टाकरखेडा संभूचे नाव त्यांनी पंचक्रोशीत पोहोचविले.

मुंबई आयआयटीमध्ये केलेल्या संशोधनातून साहेब Ph.D.झाले आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला एक अष्टपैलू कुलगुरू मिळाले.विद्यापीठाला सर्व क्षेत्रात उच्च स्तरावर नेण्याची साहेबांची धडपड सर्वांनाच सतत दिसत होती . कुलगुरू साहेबांनी “अभंग तरंग ” या माझ्या अकराव्या काव्यसंग्रहाला अभिप्रायरुपी प्रस्तावना दिली.याप्रसंगी त्यांनी ” थोर पुरुषांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील असलेला हा तुमचा “अभंग तरंग ” काव्यसंग्रह प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आवश्यक असल्याचे व्यक्त केलेले विचार माझ्या मनाला स्पर्शून गेले होते” पण माझ्या या ” अभंग तरंगा “च्या प्रकाशनापूर्वीच
साहेबांनी जगाचा निरोप घेतला.कुलगुरू साहेब अनंतात विलीन झाल्यामुळे विद्यापीठाची आणि शैक्षणिक क्षेत्राची खूपच हानी झाली.आता स्मरणयात्रेची कहाणीच फक्त उरली आहे. अमरावती विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले साहेब कधीच शांत बसले नाही.सतत कार्यरत राहिले.विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी जी धोरणे आखली त्यासाठी प्रथम खूपच अभ्यास केला कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटले तर त्याच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती विद्यापीठाला प्रगतीकडे नेणारी ठरली.साहेब आपण शैक्षणिक क्षेत्रातील एक आदर्श शिक्षणतज्ज्ञच.अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे दोन वेळा सल्लागार पद आपण भूषविले . भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेच्या वृद्धिसाठी
सतत प्रयत्न केले.

विदर्भातील तंत्र शिक्षण आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांना अर्थसहाय्य आपण मिळवून दिले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी
सतत कार्य केले.शिष्यवृत्तीची ऑनलाईन पद्धत सुरू केल्यापुळे हजारो विद्यार्थी आज लाभ घेत आहेत आणि आज आपल्या या कार्याला ते सलाम करीत आहेत.

” ज्ञान द्या ज्ञान घ्या ।
मार्ग हा यशाचा ॥
सत्य जीवनाचा ।
जाणून घ्या ॥ “

कुलगुरू साहेबांनी विद्यापीठात विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे आपण मन जिंकून घेतले होते.कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे साहेबांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांसोबत करार केले.नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात सर्व विषयांसाठी क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती.कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच विद्यापीठाचा चेहरा बदलून आदर्श कुलगुरू कसा असला पाहिजे ? याचा आदर्श निर्माण करणारे आदर्श कुलगुरू म्हणजे डॉ.दिलीप मालखेडे आज आपल्यात नाहीत ही खेदाची गोष्ट आहे .विद्यापीठाचा व विद्यार्थ्यांचा विकास करण्याची दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती,अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात क्रांती घडविणारे होते पण त्याआधीच ते निघून गेले. साहेब स्वतःच्या कर्तव्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून काम करणारे निष्ठावंत,ज्ञानवंत,प्रज्ञावंत,दूरदृष्टी असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते.

कुलगुरूपदी रुजू झाल्यावर दीड दोन महिन्यातच विद्यापीठाच्या दालनातून बाहेर पडून अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्याच्या दुर्गम भागात प्रत्यक्ष स्वतः फिरून तेथील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनस्वी प्रयत्न केले.

” विद्यार्थ्यांना असे ।
नाद अभ्यासाचा ॥
हाच प्रगतीचा ।
महामंत्र ॥ “

अशाप्रकारचा प्रगतीचा महामंत्र मेळघाटातील विद्यार्थ्यांना देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तीन दिवसाचा मेळघाट दौरा काढला व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला,त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.विविध शैक्षणिक कामाकरिता विद्यापीठात येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कामे प्रलंबित राहिली तर त्यांनी निवासासाठी जायचे कुठे ? हा प्रश्न साहेबांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी केवळ एका रुपयामध्ये विद्यापीठात त्यांच्या निवासाची सोय केली.दि.१० ऑक्टोबर २०२१ ला श्री संत गुरु रविदास महाराज अध्यासन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ.दिलीप
मालखेडे साहेबांना जेव्हा श्री संत गुरु रविदास बहुउद्देशीय जीवन विकास संस्था अमरावती या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तेव्हा साहेबांनी प्रस्ताव तयार करून शासनाकडे त्वरित पाठवून देऊ असे आश्वासन दिले होते पण आज ते हयात नसल्यामुळे येणाऱ्या नवनिर्वाचित कुलगुरू साहेबांनी सदर अध्यासन केंद्र विद्यापीठात ” माजी कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे ” यांच्या स्मरणार्थ सुरू करावे अशी माझ्यासह समस्त चर्मकार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आणि समाज बांधवांची मागणी आहे.

दि.२० ऑक्टोंबर २०२१ रोजी नांदेड येथील लेखक,कवी, समीक्षक प्रा.अशोककुमार दवणे संपादित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या पहिल्या जागतिक महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन माझ्या संयोजनाखाली व मान्यवर कवी सोबत साहेबांनी केले.या महाकाव्य ग्रंथातील भारतातील माझ्या ” भीमराव ” या अभंगासह २०२१ कवींच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील २०२१ कविता बघितल्यावर आपल्या या विद्यापीठातील ग्रंथालयासाठी व अभ्यासिकेसाठी प्रती घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.या दोन्ही कार्यक्रमातून साहेबांच्या रुजू ,नम्र,विनयशील,मनमिळाऊ स्वभावाचे दर्शन तेव्हा सर्वांनाच घडले.त्यांचे दालनातील प्रेम बघून कुलगुरू असावे तर असे, अशाप्रकारचे उदगार अनेक मान्यवर कवी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते हे विशेष.

कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे साहेबांनी विद्यापीठासाठी खूप योजना आणि अनेक प्रकल्पांची आखणी केली त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जिद्दीने खूप काही चांगले बदल घडवून त्यांना पदवीनंतर लगेच रोजगार मिळावे यासाठी प्रयत्न केले.या विद्यापीठातील प्राध्यापक व नामवंत तज्ज्ञाकडून प्रशिक्षित होऊन देशाच्या लौकिकात भर टाकण्यासाठी सज्ज व्हावे. गरीब,आदिवासी,मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे पहिले विद्यापीठ म्हणून अमरावती विद्यापीठाला बहुमानही मिळवून दिला.साहेबांची इच्छाशक्ती प्रबळ होती.कामाचा प्रचंड वेग होता. कर्करोगाने ते ग्रस्त असतानाही त्यांचा चेहरा सदैव हसतमुख असाच होता.त्यांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर आवश्यक उपचारसुद्धा करण्यात आले.प्रकृतीत सुधारणा होत असतानाच अचानकपणे प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांनी विद्यापीठासाठी पाहिलेले स्वप्न अपूर्णच राहिले.आता मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे.

” ग्रंथ वाचनाला ।
करुन घ्या सुरु ॥
सांगे कुलगुरू ।
विद्यार्थ्यांना ॥ “
” मानवाचे खरे ।
ग्रंथ हेच गुरु ॥
वाचन ते सुरू ।
नियमित ॥ “

कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे यांना अशाप्रकारची वाचनाची खूप आवड होती.हे लक्षात घेऊन ते जेथे अमरावतीमध्ये वास्तव्य करीत त्या सर्वोदय कॉलनीमध्ये त्यांच्या नावाने कुलगुरूंचे वडील श्री नामदेवराव मालखेडे व आई सौ. वेणुताई मालखेडे तसेच त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती दीपालीताई मालखेडे व माझ्यासह डॉ.संजय खडसे आणि अनेकांच्या सहकार्यातून ” कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालय ” सुरू करण्यात आले.या वाचनालयाला अनेकांनी देणगी रूपाने पुस्तके व कपाट देऊन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला व आजही तो सुरू आहे. मी सुद्धा देणगी स्वरूपात विविध विषया वरील १७५ पुस्तके या वाचनालयाला भेट दिलेली आहेत.तेथे विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व इतर विद्यार्थी यांना पुस्तके देण्याची,वाचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आज दि .27 ऑगस्ट
2023 कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे यांच्या 57 व्या जयंती दिनानिमित्त ” उद्योजकीय मानसिकता विकसित करणे ” ( Developing Enterpreneurial Mindset )या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेतून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करणार आहे.

अशा अष्टपैलू – प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे साहेबांना त्यांच्या ५७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.

” कुलगुरूंना मी ।
करितो नमन ।
करांनी वंदन ।
जन्म दिनी ॥ “

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here