प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर
जळगांव – क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाज संघाला या वर्षी शतकोत्तरी तथा दिडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा समन्वयक सत्यशोधक विजय लुल्हे यांनी ‘ महात्मा जोतिराव फुले ‘ : प्रा.गौतम जगन्नाथ निकम लिखित एकूण ६० पुस्तकांचे ग्रंथदान केले.
महात्मा फुले यांचा बुद्धिवादी व मानवतावादी दृष्टिकोन त्याचप्रमाणे समर्पित लोकसेवा आणि निर्भय लोकजागृतीचे प्रेरणादायी समग्र व्यापक कार्य कळावे ही ग्रंथदाना मागे लुल्हे यांची प्रांजळ भुमिका आहे.यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्य नगर,जळगाव वाचनालयासाठी सम्रग्र महात्मा फुले लिखित ११ पुस्तकांचा सेट वाढदिवसा निमित्त लुल्हे यांनी भेट दिला तसेच सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई मेथाळकर यांना संक्रांतीचे वाण म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची चरित्रात्मक प्रेरणादायी वाचनीय पुस्तके माता भगिनींना भेट देण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन केले. ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी स्थापन करून भिशी तर्फे जिल्ह्यात ३ वर्षापासून वाचन चळवळ वर्धिष्णु करीत आहेत.सत्यशोधक विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवन कार्याची योग्य वयात ओळख होऊन प्रेरणा मिळावी,राष्ट्रप्रेम तथा देशभक्ती मुल्यांची रुजवात व्हावी,सामाजिक बांधिलकीचे भान यावे,ध्येयनिष्ठा व कर्तव्यनिष्ठा अंगी येऊन सर्वांगीण विकास व्हावा,वाचनाची गोडी लागावी या उदिष्टाने ग्रंथप्रेमी निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी स्वर्गीय पूज्य पिताश्री सुपडू नथू सुतार व स्वर्गीय भगिनी वंदना भुपेंद्र बुंदेले यांच्या स्मरणार्थ श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ आयोजित सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या गुणगौरव समारंभात सदरहू वाचनीय पुस्तके ग्रंथभेट देऊन वाचन चळवळ संवर्धनासाठी अमूल्य योगदान दिले.धार्मिक ग्रंथ, दुष्ट पारंपारिक चालीरीती, धर्मभोळ्या अंधश्रद्धा यांच्या मानसिक गुलामगिरीच्या मगरमिठीची अशिक्षित वर्गाला जाणीव देऊन प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिके व विविध स्पर्धांचे आयोजन तसेच पुरोगामी नियतकालिकांचे वर्गणीदार नोंदवणे अशा वेगवेगळ्या कार्यातून विजय लुल्हे सत्यशोधक समाजाच्या ध्येय धोरणांचा यथाशक्ती प्रचार व प्रसार निरंतर करीत असतात.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी विश्वकर्मा सांस्कृतिक भवन आंबेडकर मार्केट नजीक जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव असून प्रमुख अतिथी आमदार राजू मामा भोळे,नगरसेविका जयश्रीताई महाजन,नगरसेवक धीरज भाऊ,कार्याध्यक्ष डॉ.बि.डि.सुतार,सुतार जनजागृती संस्था राज्याध्यक्ष बाळासाहेब वाघ( नाशिक ),रमेश बाविस्कर ( मुंबई ),जनजागृती संस्था जिल्हाध्यक्ष मनीषाताई मेथाळकर मान्यवर,मंडळाचे उपाध्यक्ष निलेश सोनवणे,कोषाध्यक्ष मनोहर रुले व पदाधिकारी उपस्थित होते.प्रस्तावना मंडळाचे सचिव एम.टी.लुले यांनी केली.सुत्रसंचालन कांचन राणे व आभार प्रदर्शन भागवत रुले यांनी केले.