विविध रोगांसह संत्रावर संशोधन करण्याची रुपेश वाळके यांची मागणी !
मोर्शी वरुड तालुक्यात मार्गदर्शन केंद्र सुरू न झाल्यास रुपेश वाळके यांचा आंदोलनाचा ईशार !
मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.22ऑगस्ट):- तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा गळती, संत्रा झाडांची पाने पिवडी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. संशोधकांनी व कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली आहे.
मोर्शी तालुका हा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सतत संकटांची मालिकाच सुरु आहे अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही संत्राला मिळणार अत्यल्प भाव, संत्रा गळती, अश्या दृष्ट्चक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे. यावर्षी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्याने संत्राचे उत्पादनचे धोक्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात तापमान ४५ डिग्रीच्यावर गेल्यामुळे संत्राच्या झाडाला वरील संत्र्याचे फळ गळून पडत आहे. सोबतच ब्लॅक फंगस नावाचा रोग आल्याने सुद्धा संत्र्याची गळती मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
त्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे मात्र कृषी विभागाच्या व संशोधकांच्या उदासीनतेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसून मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा झाडावर कोलत्या (शेंडे मर, पायकूज व मुळकूज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहे. परिणामी शेतकर्यांनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असून संत्रा बागा उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरीही संशोधक व कृषी विभाग अजूनही कुंभाकर्णी झोपेतच असल्याचे चित्र दिसत असून संशोधकांकडून व कृषी विभागाकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर केल्या जात नसून साधी संत्रा बागांची पाहणी करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी या अज्ञात रोगापासून अनभिज्ञ आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग यांच्या उदासीन धोरणामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था व क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संशोधकांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल. विविध रोगांवर, संत्रा फळं गळतीवर नेमके काय उपाय आहेत. त्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून मोर्शी वरुड तालुक्यात तज्ञांचे मार्गडदर्शन केंद्र सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली असून तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
मोर्शी वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा गळती होत असून फळांची झाडे पिवळी पडत आहे व काही झाडे सुकत आहेत. झाडावरील फळे काळे पडत आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होतांना दिसत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याला शासनाचे उदासीन धोरण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांचा अभाव तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांचा नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे.—- रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य.