Home अमरावती समाजसेवक श्री.टी.एफ.दहिवाडे-एक आदर्श व्यक्तिमत्त्व

समाजसेवक श्री.टी.एफ.दहिवाडे-एक आदर्श व्यक्तिमत्त्व

89

तथागत बुद्धभूमी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष, बुद्ध- फुले- शाहू-आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करणारे,सर्वधर्मसमभावाची विद्यार्थ्यांना शिकवण देणारे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक मा.श्री.टी.एफ.दहिवाडे सर यांना त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि त्यांच्या अनेक स्नेहिजणांनी व साहित्यिकांनी सरांचे व्यक्तिमत्व शब्दबद्ध केलेल्या “अमृतयोगी ” या स्मरणिकेच्या प्रकाश सोहळ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!

श्री टी.एफ.दहिवाडे सरांच्या दि.20 ऑगस्ट 2023 ला असलेल्या अमृतमहोत्सवा निमित्त त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वावरील हा लेखप्रपंच.पळसवाडा,ता.वरूड,जि. अमरावती येथे कै.फकिरजी व कै.यशोदाबाई यांच्या पोटी सन – १९४८ सालातील जून मासाच्या अठरा तारखेला एक गोंडस बाळ जन्मास आले. त्याचे नाव तुकाराम ठेवण्यात आले.पुढे हाच तुकाराम बी.ए., बी.एड. शिक्षण घेऊन आदर्श शिक्षक व समाजसेवक मा.श्री.तुकारामजी फकिरजी दहिवाडे झाले, ते सम्राट अशोक विद्यालय, मांजरी म्हसला, ता.नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथे सन १९७३ साली सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले आणि सन १९९० पासून २००६ पर्यंत त्यांनी याच विद्यालयात माध्यमिक शाळा मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. या सेवाकाळात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या आदर्श अध्यापनामुळे व आदर्श मार्गदर्शनामुळे आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर विराजमान झालेले आहेत.

” सुसंस्कार देई। सर दहिवाडे। विद्यार्थी हा घडे । शाळेतून ।।”

तुकाराम फकिरजी दहिवाहे ३३ वर्षांची कार्यसेवा करून दि.३०-६-२००६ ला सेवानिवृत्त झाले.ते सन -१९७३ ते १९९० या कार्यकाळात शिक्षक असताना तर विद्यार्थीप्रिय होतेच शिवाय सन-१९९० ते २००६ या काळात मुख्याध्यापक असताना विद्यार्थीप्रिय होण्यासोबतच शिक्षकप्रिय झाले कारण

” आदर्श गुरुजी । सर दहिवाहे।
गंध चोहिकडे । मंदिरात ।।

अर्थात त्यांच्या आदर्श अध्यापनामुळे व आदर्श प्रशासनामुळे सम्राट अशोक विद्यालयात ( विद्यामंदिरात) त्यांच्या कार्याचा सुगंध चोहिकडे  दरवळत होता. आजपर्यंत मा.श्री. दहिवाडे यांनी विविध संस्थांची अनेक पदे भूषवून त्या त्या पदानुसार त्यांनी कार्य केलेली आहेत आणि आजही वयाच्या ७५ व्या वर्षीही सुरू आहे.ते २००१ ते २००४ पर्यंत नांदगाव खंडेश्वर तालुका शैक्षणिक विचार मंचाचे सचिव पदावर असताना विविध कार्यक्रम राबविले,सचिव पदावर कार्यरत असताना केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणजे याच शैक्षणिक विचार मंचाचे २००४ ते २००६ म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत अध्यक्षपद भूषविले आणि या दोन वर्षांत त्यांनी अध्यक्षपदावरून जे कार्य केले ते महत्त्वपूर्ण आहे. सन -२००० से २००६ या काळात श्री दहिवाडे सरांनी अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सदस्यपद भूषविले होते.बहुजन शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अमरावतीचे अध्यक्ष असताना शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले.

अमरावती येथील प्रशांत नगर मधील तथागत बुद्धभूमी बहुउद्देशीय विकास संस्था या नोंदणीकृत संस्थेचे सर आजही अध्यक्ष पदावर कार्यरत असून विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून ते समाजप्रबोधन करीत असतात.सन -१९७८ ते १९८३ या काळात माजरी म्हसला ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते. या कार्यकाळात त्यांनी या ग्रामाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयास केला. दिवंगत संजय ठोंबरे संपादित यशोदा नगर मधील साप्ताहिक प्रेरणाविश्वचे ते मार्गदर्शक म्हणून कार्य करीत होते. दर्यापूर येथील बहुजन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे ते प्रवर्तक आहेत. अशा विविध संस्थांच्या भूषविलेल्या पदावरून त्यांनी केलेले कार्य हे अनमोल असेच आहे.टी.एफ. दहिवाडे सरांनी आपल्या जीवनात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

शिक्षक असताना सरांनी फक्त आदर्श अध्यापनाचे कार्य केलेले नाही तर त्यांची शाळा ही मांजरी म्हसला.ता.नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती या ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या शाळेतील विद्यार्थी वर्ग हा झोपडीतील साधारण वर्गातील गरीब विद्यार्थी होता. सर अशा विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन स्वतः शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्याच्या समस्या दूर करीत असत. उदा वह्या,पुस्तके,गणवेष शैक्षणिक फी इ.नांदगाव तालुक्यातील सावनेर येथे दलित वस्तीमध्ये जेव्हा आग लागली होती तेव्हा त्यात इतर साहित्यासोबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले होते. सरांना जेव्हा ही गोष्ट माहित झाली तेव्हा तेथे जाऊन चौकशी केली. विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची दयनीय झालेली अवस्था बघून त्या जळीत घरातील विद्यार्थ्यांना वह्या,शालेय पाठ्यपुस्तके व दफ्तरासह मदत करून त्यांची शैक्षणिक समस्या सोडविली.

” दहिवाडे सर । कर मदतीचा।
लय तिमिराचा । करितसे ।।”

आदर्श अध्यापन व इतर शैक्षणिक मार्गदर्शनासाठी मा.श्री, दहिवाडे सरांनी शैक्षणिक विचार मंचच्या माध्यमातून माध्यमिक शाळेतील विषय शिक्षणकांच्या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन केले होते. तालुका स्तरावरील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करून तालुक्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानातील अनेक प्रयोगाचे प्रत्यक्ष दर्शन घडल्यामुळे इतरही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल गोडी निर्माण झाली होती. तसेच तालुका स्तरावरील विविध खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळाविषयची प्रेरणा निर्माण झाली. त्यामुळे पुढच्या क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊन यशस्वी होत होते.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि

“वृक्ष लागवड । संगोपन तरू। संवर्धन करू। आनंदाने ।।”

वृक्षारोपणाचे मोल विद्यार्थ्यांना सांगून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम राबवून या उपक्रमाला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे त्यांना नेहमीच वाटत असे. त्यासाठी त्यांनी विविध विषयावरील मार्गदर्शनाचा लाभ विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळवून दिला. चित्रकला, हस्तकला, लेखन, सामान्यज्ञान अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन सरांनी केलेले आहे.आजारी असताना अथवा दीर्घ सुटीवर असताना विद्यार्थ्यांचा मागे असलेला अभ्यासक्रम ते अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण करीत,इतरांनाही त्याच्या या कार्यातून प्रेरणा मिळत असे.

सरांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही महत्त्वपूर्ण आहे. सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासण्यासाठी उदबोधन शिबीरांचे आयजोन करून विज्ञाननिष्ठा जोपासली. वर्षभर येणाऱ्या थोर पुरषांच्या जयंती – स्मृतिदिनानिमित्त व राष्ट्रीय सणांच्या वेळी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांपर्यंत थोरांचे विचार – तत्त्वज्ञान पोहोचविण्याचे मोलाचे कार्य सतत केले नेत्र तापसणी, कुठरोग तपासणी, रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन तथा अनेत शिबीरांना मदतही केलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शालेय साहित्याचे वाटप करून इतर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य सरांनी केलेले आहे.

आज बेरोजगारी खूप वाढलेली आहे म्हणूनच श्री. दहिवाडे सरांनी सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय व नोकरीच्या संदर्भात तज्ज्ञांद्वारे निशुल्क मार्गदर्शन करण्याचे कार्यही केलेले आहे.वधू-वर संसोधनाची समस्या लक्षात घेऊन सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजनही सरांनी केलेले आहे. समाजातील उपवर मुला-मुलींच्या वधू-वर संशोधनासाठी समाजाचा जो पैसा, श्रम आणि वेळ व्यर्थ जात होता, तो या वधू-वर परिचय मेळाव्यामुळे वाचत असून वधू-वर संशोधनही वेळेवर होऊन मुला- मुलीचे विशिष्ट वयातच विवाह होत आहेत.ही समाजाची समस्या लक्षात घेऊनच श्री.दहिवाडे सरांनी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले होते.

मुख्याध्यापक पदी रुजू झाल्यावरच नव्हे तर शिक्षक असतानाही सम्राट अशोक विद्यालयाचा पूर्ण परिसर स्वच्छ करून घेणारे श्री.दहिवाडे सर वर्ग स्वच्छता, प्रांगण स्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांना नेहमीच स्वच्छतेविषयीचे मार्गदर्शन करीत असत आणि कर्मयोगी संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत असत. शालेय वार्षिक स्नेहसंमेलनांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारे श्री.दहिवाडे सर विविध विषयावरील तज्ज्ञांना प्रमुख अतिथी,प्रमुख वक्ते म्हणून पाचारण करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा वर्धित करण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे.त्यांचा नम्र स्वभाव सर्वांना आवडत असे

“आदर्श शिक्षक। स्वभाव तो नम्र।
सर्वांशी विनम्र । वर्तणूक ॥

मुख्याध्यापक असताना सम्राट अशोक विद्यालयाला स्वतःच्या अथक प्रयत्नाने जीवदान देऊन विद्यालयाची प्रगती साधणारे, थोर पुरुषांचा विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणारे, बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करणारे, सर्वधर्म समभावाची शिकवण विद्यार्थ्यांना देणाऱ्या टी.एफ.दहिवाहे सरांना अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो, ही मनस्वी सदिच्छा!

” आदर्श गुरुना । करितो प्रणाम।
माझा हा सलाम। सुकर्माना॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here