आज आपण आपल्या देशाच्या ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आजच्याच दिवशी ७६ वर्षापूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतुन मुक्त झाला. त्यापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज बघता बघता या देशाचे मालक बनले आणि कोट्यावधी भारतीयांना त्यांनी गुलाम बनवले. देश पारतंत्र्यात गेला. सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. तेवढ्या काळात त्यांनी आपला इतिहास, आपला पराक्रम आपला स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम केले. ज्या देशात सोन्याचा धूर निघत होता त्या देशाला कंगाल करण्याचेच काम त्यांनी केले. देशातील नागरिकांना गुलामीची वागणूक दिली. गोरगरीब, सरळ साध्य मार्गाने जगणाऱ्या भारतातील नागरिकांवर त्यांनी अनन्वित अत्याचार केला. इंग्रजांच्या या अन्याय अत्याचाराने त्रस्त झालेल्या जनतेने इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव केला तो १८५७ साली. दुर्दैवाने हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही तरी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी भारतीयांना प्रेरणा देणारा हा उठाव ठरला. या उठावातूनच प्रेरणा घेऊन पुढे हजारो देशभक्त निर्माण झाले. काहींनी सशक्त क्रांतीने तर काहींनी अहिंसेच्या विधायक मार्गाने इंग्रजांशी लढा पुकारला.
देश स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो क्रांतिकारांनी स्वतःचे रक्त सांडले, काही फासावर चढले तर काही इंग्रजांच्या गोळीने शहीद झाले. कित्येकांनी तुरुंगवास भोगला. काहींनी काळ्यापाण्याची तर काहींनी जन्मठेपेची शिक्षा भोगली. अशा कित्येक ज्ञात अज्ञात वीरांच्या बलिदानाने देश स्वातंत्र्य झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री १२ वाजता दिल्लीच्या लाल किल्यावर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकवला आणि देशात स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली. देश स्वातंत्र्य होऊन आज ७६ वर्ष पूर्ण होऊन ७७ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. ७६ वर्ष हे कोणत्याही देशाचे मूल्यमापन करण्यासाठी तसा अतिशय कमी कालावधी पण इतक्या कमी कालावधीतही आपला देश जगातला सर्वाधिक प्रगत देश म्हणून ओळखला जात आहे. गेल्या ७६ वर्षात आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, शिक्षण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जो देश सुई ही बनवू शकत नाही असे मानले जात होते तो देश आज चंद्रावर स्वारी करत आहे.
भारताने घेतलेली ही गरुड झेप कोणालाही हेवा वाटेल अशीच आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीकडे पाहिले जाते. देश स्वातंत्र होऊन ७६ वर्ष उमटली तरी आपल्या लोकशाहीला अजून कशाचेही गालबोट लागले नाही. २६ जानेवारी १९५० पासून आपला देश प्रजासत्ताक बनला.
भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीने लिहिले. त्या संविधानानुसारच देशाचा कारभार चालू आहे. विविध, जाती, धर्म, पंथाचे लोक या देशात गुण्या गोविंदाने राहतात. प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी, पेहराव वेगळा, संस्कृती वेगळी असे असले तरी भारतवासीय म्हणून सर्व एक आहोत हीच एकी आपली ओळख आहे. वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या जाती, धर्माच्या १४० कोटी लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम आपल्या संविधानाने केले आहे. म्हणूनच भारतीय संविधानाला जगातील सर्वोत्तम संविधान असे समजले जाते. भारतासोबतच स्वातंत्र्य झालेल्या आपल्या शेजारील राष्ट्राची आज काय अवस्था आहे हे आपण पाहतोच आहे. अवघ्या ७६ वर्षात भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास आले. जागतिक महासत्ता बनण्याकडे आपण पाऊले टाकत आहोत. प्रगतीची हीच घोडदौड अशीच चालू राहिली तर आगामी २५ वर्षात भारत जागतिक महासत्ता बनेल यात शंका नाही. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या देशवासीयांना मनापासून शुभेच्छा! जय हिंद!! जय भारत!!!
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५