आपल्या भारत देशाला स्वातंत्र्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला…. फार मोठे स्वातंत्र्य समर लढावे लागले…. या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली… सर्वस्वाचा त्याग केला….. तेव्हा कुठे आपला देश स्वातंत्र्य झाला… याचे जाण आणि भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे…. जात-पात-धर्म यापेक्षा देश महत्त्वाचा असतो हे प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे…. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवा या मूल्यांची रुजवण आणि जोपासना झाली पाहिजे…. घराघरात आणि मनामनात राष्ट्रनिष्ठा वाढली पाहिजे…. आपला देश, आपला राष्ट्रध्वज आणि आपली राष्ट्रीय प्रतीके हे खऱ्या अर्थाने सर्व भारतीय नागरिकांची आण-बाण-शान आणि अभिमान बनली पाहिजेत…. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मनामनात जिवंत राहिल्या पाहिजेत…
किती जणांनी घरदार सोडले
किती जणांनी सर्वस्व अर्पिले…
किती जणांनी रक्त सांडले
किती जणांनी बलिदान दिधले…
त्यांची आठवण थोडी काढूया
त्यांचा त्याग समजून घेऊया…
समर्पणाचे महत्त्व जाणून घेऊया
स्वातंत्र्यलढा आठवूण पाहूया…
15 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतभरात अत्यंत उत्साहाने साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश अभियान यावर्षी राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात नायक, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी यांनी केलेला त्याग…. दिलेले बलिदान…. लक्षात राहावे. स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्व देशभक्तांनी चेतवलेले स्फुल्लिंग सर्व भारतीय जनसामान्य माणसाच्या मनात कायम तेवत राहावे…. आपल्या दैदिप्यमान भारतीय इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण व्हावे…. या उदात्त आणि विधायक उद्देशाने “मेरी मिट्टी मेरा देश” हा उपक्रम या वर्षी राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत सर्व शासकीय -निमशासकीय कार्यालये, सर्व सहकारी संस्था, सर्व शैक्षणिक संस्था इथे 13 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या तीन दिवस नियमानुसार राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. यासोबतच सर्व खाजगी आस्थापना आणि सर्व नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरोघरी तिरंगा ध्वज उभारायचा आहे.
आपला तिरंगा राष्ट्रध्वज हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वयंस्फूर्तीने प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा ध्वज उभारूया. राष्ट्रध्वजाचा उचित मान-सन्मान ठेवूया….
आपल्या देशात विविध जातीचे, धर्माचे, संप्रदायाचे लोक राहतात…. आपल्या देशात अनेक राज्य आहेत … केंद्रशासित प्रदेश आहेत… वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी भाषा बोलली जाते….. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा जपला जातो… आपल्या देशात अनेक बाबतीत विविधता आहे… तरीसुद्धा देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय अस्मिता याबाबतीत आपण सर्वजण एक आहोत… यालाच विविधतेत एकता म्हणतात… आपला भारतीय इतिहास आणि आपल्या परंपरा यांना खूप मोठा दैदिप्यमान वारसा आहे… आपल्या देशात प्रचंड नीतिमत्ता रुजलेली आहे… मूल्य, तत्व, विचार, सहिष्णुता, संवेदनशीलता यांचा भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा प्रभाव आहे… समता, न्याय, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही भारतीयांच्या मनामनात आहे…. भारतामध्ये अत्यंत भावनिक आणि संवेदनशील माणसे राहतात. इथे परस्परांवर प्रेम, आपुलकी, माया-जिव्हाळा लावला जातो. भारतात खऱ्या अर्थाने माणुसकी जपली जाते. मानवता हाच खरा धर्म मानला जातो. केवळ मानवावरच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन प्राणीमात्रावर दया करा… निसर्गाचे संवर्धन करा… या उदात्त्वाचा पाठपुरावा करणारी आमची संस्कृती आहे…
असा उदात्त इतिहास आणि वर्तमान असणाऱ्या देशाचे आम्ही नागरिक आहोत. याची जाणीव ठेवून. राष्ट्रध्वजाचा उचित मान-सन्मान करून …. राष्ट्रध्वजाची संपूर्ण आचारसंहिता पाळून… आम्ही सर्व भारतीय नागरिक दिनांक 13 ऑगस्ट 2023 ते दिनांक 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत घरोघरी तिरंगा उभारणार आहोत….
तिरंगा आमची आण आहे
तिरंगा आमचा प्राण आहे…
तिरंगा आमची शान आहे
तिरंगा आमचा अभिमान आहे…
हे हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवून सिद्ध करणार आहोत….
चला घरोघरी तिरंगा उभारूया……
हे राष्ट्र माझे, मी राष्ट्राचा
शुद्ध भाव हा मनात ठेवूया
देशभक्तीचा वसा घेऊनी
ध्वज तिरंगा फडकवूया……
चला घरोघरी तिरंगा उभारूया….
जात कोणती..? धर्म कोणता..?
भेदभाव सारे विसरून जाऊया
एक मनाने…. नेक मनाने
पुन्हा नव्याने बंधुभाव जपूया
चला घरोघरी तिरंगा उभारूया….
स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पिले
त्या देशभक्तांना जरा स्मरूया
आजही लढती सीमेवरती
वीर सैनिकांचा आदर करूया…
चला घरोघरी तिरंगा उभारूया….
शान तिरंगा, अभिमान तिरंगा
मान तिरंगी जगास दावूया
सन्मान करूनी राष्ट्रध्वजाचा
आचारसंहिता सारे पाळूया….
चला घरोघरी तिरंगा उभारूया….
एक होऊनी स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव साजरा करूया
घराघरावर… मनामनावर....
आपुला तिरंगा ध्वज उभारूया….
चला घरोघरी तिरंगा उभारूया….
✒️मयूर मधुकरराव जोशी(विठ्ठल रुक्मिणी नगर जिंतूर)मो:-9767733560(WhatsApp)
7972344128 (calling)