✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.3ऑगस्ट):-दहिवडी ता.माण येथील फलटण चौक ते मार्डी चौक परिसरात आठवडी बाजार असल्याने वाहतूककोंडी होत असते.असाच प्रकार सोमवारच्या आठवडी बाजारात घडला.माण तालुक्याचे मुख्यालय असल्याने दहिवडीसह माण तालुक्यातील नागरीक सोमवारी आठवडी बाजारासाठी येत असतात.
वाहतूककोंडीचा प्रश्न माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीत गंभीर होत आहे.तहसिल कार्यालय,प्रांत कार्यालय,पोलीस स्टेशन,दहिवडी कॅालेजसह अनेक प्रशासकीय कार्यालये दहिवडीत आहेत.परंतू सोमवारची वाहतूककोंडी वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे.वाहतूक पोलीस वाहतूककोंडी होत असलेल्या ठिकाणी हजर नसल्याने सोमवार दिः३१ रोजी दहिवडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका मायणी चौक परिसरात सायरन सुरू असूनही बराचवेळ वाहतूककोंडीत अडकून पडली होती.
ही बाब वाटते तेवढी सोपी नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाची जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? अशी चर्चा सोमवारच्या आठवडी बाजारात ऐकायला मिळत होती.या प्रकरणाची दखल घेऊन दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस नेमून वाहतूककोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार का? याकडे माणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.