Home पुणे मोदी दौरा: झाकला गेला भिडेवाडा!

मोदी दौरा: झाकला गेला भिडेवाडा!

126

(मोदी दौरा व पुण्यातील भिडेवाडा विशेष)

पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या भिडेवाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. सन १८४८ मध्ये सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा इथेच स्थापन केली होती. या जुन्या वस्तूच्या दुरूस्तीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. दि.१ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा वाडा पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीतील अनेक पारंपरिक घरांपैकी एक आहे. १८व्या शतकात पुणे ही पेशव्यांची राजधानी असताना या वास्तू बांधल्या गेल्या होत्या. त्यातील बहुतेक वैशिष्ट्यपूर्ण वाडे दोन मजली उंच आणि आयताकृती मांडणीचे होते. या वाड्याच्या मध्यभागी आठ खोल्या, एक विहीर आणि शौचालयाची सुविधा होती. त्यांच्या एकत्र कुटुंबातील बरेच सदस्य आणि अगदी जवळचे मित्र या वाड्यात राहायचे. हा वाडा पेशवाईच्या काळात शासकवर्गाच्या सदस्यांसाठी, तसेच उच्च वर्गाच्या नागरिकांसाठीही निवासव्यवस्था म्हणून वापरला जात असे. भिडेवाड्याच्या अंगणातूनच अनेक सामाजिक चळवळी सुरू झाल्या होत्या. आज मंगळवार दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी माझ्या महान भारतदेशाचे सर्वेसर्वा पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी महाराष्ट्राची सांस्कृतिक पंढरी- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहराच्या दौऱ्यावर आले. तेव्हा ही अगदी मोडकळीस आलेली ऐतिहासिक वास्तू अर्थात बहुजन समाजास शैक्षणिक महत्त्व, न्याय व हक्क दाता भिडेवाडा भल्या मोठ्या व महागड्या पडद्याने झाकला गेला. स्वागत समारंभाच्या शानदार सजावटीस तो बाधक व कलंक ठरू नये म्हणून…! यातरी मिसाने त्याची थोडी थोडकी डागडुजी होणे अगत्याचे असतानाच प्रसंगावधान साधून ‘गु’ झाकल्यासारखी कृती करण्यात आली, ती अगदी ज्ञानी-गुणी जनांच्या दृष्टीने निषेधार्हच! ती एक घाण नसून स्वयं प्रकाशक ज्ञानाची साक्ष आहे, हे या बांडगुळांना कोणी कसे सांगावे? असा खरमरीत लेख श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या लेखणीतून, जरुर वाचा… 

भिडेवाड्यात शाळेची स्थापना करणाऱ्या सावित्रीबाई फुले नऊ वर्षांच्या असताना त्यांचे १३ वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झाले होते. माळी जातीतील असल्याने त्यांना मागासवर्गीय म्हणून हिणवले जात होते. त्यांना सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्याही वंचित ठेवले जाई. सावित्रीबाईंनाही केवळ स्त्री असल्यामुळे नाही, तर जातीपातीमुळेदेखील औपचारिक शिक्षण नाकारले गेले. घरी शिक्षण देणाऱ्या त्यांच्या पतीकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्या स्वतःच शिक्षिका बनल्या. शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका होणारी ती पहिली भारतीय महिला होती. सावित्रीमाईसोबत फातिमा शेख यांनी सुद्धा बहुजनांच्या मुलांना बालविद्या शिकविण्यात कमी पडल्या नाहीत.

स्वदेशी ग्रंथालय किंवा भिडे शाळा म्हणून ओळखली गेलेली ही शाळा उघडणे, त्याकाळी बर्‍याच अर्थाने क्रांतिकारी कार्य होते. त्या काळाच्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणारे होते. त्याकाळी शिक्षण ब्राह्मण जातीपुरतेच मर्यादित होते. त्यामुळे शिक्षण आणि शाळा सुरू करणे या दोन्ही गोष्टी क्रांतिकारी होत्या. त्यात ब्राह्मण शिक्षकांनी हा अभ्यासक्रम शिकवण्यास नकार दिला. या अभ्यासक्रमात वेद आणि शास्त्र यांसारख्या धार्मिक ग्रंथांच्या अध्यापनाची जागा गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या वैज्ञानिक विषयांनी घेतली. शिक्षणसम्राट महात्मा फुले यांची शिकवण्याची पद्धत इतकी लोकप्रिय झाली की, त्यांनी ज्या शाळांमध्ये प्रवेश केला, तेथील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांपेक्षा मुलींची आकडेवारी जास्त नोंदविली गेली. मात्र, या दाम्पत्याला त्यांचे कुटुंब आणि समाज यांनी वाळीत टाकले, बहिष्कृत केले. सावित्रीबाई फुले यांना शाळेत जाताना एक साडी जास्त घेऊन जावी लागे, कारण रस्त्यात लोक त्यांच्यावर दगडफेक करत, शेण फेकत असत. या तरुण जोडप्याला सन १८४९ मध्ये त्यांच्या घरच्यांनीही खालच्या जातीला शिक्षण देत असल्याच्या कारणाने घराबाहेर काढले. मात्र, फातिमाई शेख आणि त्यांचा भाऊ उस्मान यांनी फुले यांचे त्यांच्या घरी स्वागत केले. पुढे १९व्या शतकातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून याच फातिमाई शेख यांचे नाव नोंदले गेले. महिलांना सुशिक्षित करण्याच्या प्रयत्नात त्यांनी सावित्रीबाईंना मोलाची साथ दिली.

सद्या जीर्ण अवस्थेत असलेला हा भिडेवाडा भाडेकरूंच्या हक्कांबाबतची लढाई लढतो आहे. सन १९९०च्या दरम्यान तो पुणे मर्चंट्स को. ऑप. बँकेकडे तारण ठेवण्यात आला आणि शेवटी २००० मध्ये मंत्री किशोर असोसिएट्सला विकला गेला. त्यावर्षी पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर सुमारे ५०० अंगणवाडी शिक्षिकांनी जोरदार निदर्शने केली होती. सन २०१७मध्ये शाळेला राष्ट्रीय वारसा दर्जा देण्यासाठी, तसेच वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या मागणीसाठी ३०० हून अधिक जणांनी मानवी श्रृंखला बनविली होती. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्या जागेवर ग्रंथालय बनविण्याचा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. या व्यतिरिक्त “भिडे वाडा वाचवा!” मोहीम सुरू झाली असून, सरकारला हे राष्ट्रीय स्मारक करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही सरकार कानात बोळे आणि डोळ्यांसमोर असे महागडे पडदे उभारून दिमाखात मिरवित आहे, लाखमोलाचा नुसताच!

पुणे महानगरपालिकेने वाडा पूर्ववत करण्याचे आश्वासन देऊनही या जागेकडे दुर्लक्ष केले आहे. फुले यांची दोन छायाचित्रे असलेला नीलफलक आणि इमारतीच्या महत्त्वाचे थोडक्यात वर्णन एवढीच काय ती वाड्याच्या वारशाची चिन्हे आहेत. आज मंगळवार दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी माझ्या महान भारतदेशाचे सर्वेसर्वा पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी महाराष्ट्राची सांस्कृतिक पंढरी- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहराच्या दौऱ्यावर आले. तेव्हा ही अगदी मोडकळीस आलेली ऐतिहासिक वास्तू अर्थात बहुजन समाजास शैक्षणिक महत्त्व, न्याय व हक्क दाता भिडेवाडा भल्या मोठ्या व महागड्या पडद्याने झाकला गेला. स्वागत समारंभाच्या शानदार सजावटीस तो बाधक व कलंक ठरू नये म्हणून…! यातरी मिसाने त्याची थोडी थोडकी डागडुजी होणे अगत्याचे असतानाच प्रसंगावधान साधून ‘गु’ झाकल्यासारखी कृती करण्यात आली, ती अगदी ज्ञानी-गुणी जनांच्या दृष्टीने निषेधार्हच! ती एक घाण नसून स्वयं प्रकाशक ज्ञानाची साक्ष आहे, हे या बांडगुळांना कोणी कसे सांगावे? सत्ताधारी पुढाऱ्यांच्या अशा असंवेदनशील पणाने व रेंगाळी स्वभावामुळेच अशी दैनावस्था झाली आहे. असो, पण जगात भारी म्हणून मिरविणारे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी दगडुशेठ हलवाई गणेशदर्शन केले, मोठाल्या शैक्षणिक संस्थामध्ये उतरले, थांबले व विश्राम फर्मावले, मात्र तेथील लगतच्या या जगप्रसिद्ध शैक्षणिक आणि ऐतिहासिक वास्तुच्या धावत्या भेटीची- पाहणीची त्यांना साधी इच्छा होऊ नये, हेच किती दुर्भाग्यपूर्ण! नाही का?

✒️जोतिबांचा लेकरू:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here