✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.19जुलै):-पिक विमा काढण्यात शासनाने ३१जुलै रोजी पर्यंत तारीख दिली आहे,मात्र मान्सून सत्र आणि शेती हंगाम सुरू झाल्याने अनेक शेतकरी शेती कामात व्यस्त झाले आहेत.सततच्या पावसामुळे व खराब वातावरणामुळे जिल्ह्यात बहुतांश भागात नेटवर्कची बरोबर व्यवस्था नाही त्यामुळे ८-१० किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या किंवा इंटरनेट असलेल्या मोठ्या गावाच्या ठिकाणी जावे लागते,इतका प्रवास करूनही बऱ्याच वेळा नेटवर्क आणि अन्य तांत्रिक अडचणी वारंवार येत असतात आणि याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे.
सद्या सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक रस्तेही बंद झाले आणि अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे,अश्या परिस्थितीत बरेच शेतकरी पिक विम्याचा फार्म भरू शकत नाही.त्यामुळे पिक विमा नोंदणी करीता मुदतवाढ देण्यात यावी व ज्या ठिकाणी नेटवर्क ची अडचण आहे अश्या गावांत तलाठी मार्फत पिक विम्याची ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी करण्यात यावी अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.