✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहमदनगर(दि.18जुलै):- “आधुनिक युगात सोशल मीडियाचा वापर कमी करून वाचन संस्कृती टिकवणे गरजेचे असून वाचनामुळे मनुष्य जीवनात क्रांती घडते, वाचनामुळे अनेकांना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या असुन वाचनाने त्यांचें जीवन समृध्द बनले” असल्याचे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.
देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या श्री.त्रिंबकराज मोफत वाचनालयामध्ये राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त लेखक म्हणून गोसावी यांचे व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी अजित निकत हे होते.
पुढे बोलताना सुनील गोसावी म्हणाले कि, “ वाचन संस्कृती टिकविणे गरजेचे आहे, वाचन संस्कृतीमुळे मनुष्य जीवनात फार मोठे बदल होतात, त्याचबरोबर सामाजिक क्रांतीही घडते. वाचन संस्कृतीमुळे एखादा व्यक्ती लेखक, कवी बनू शकतो. तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. देवळालीप्रवरा नगरपालिकेने सुसज्ज असे श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालय उभारलेले आहे. या वाचनालयात अनेक मोठ मोठे ग्रंथ आहेत. या ग्रंथाचा नागरिकांनी फायदा घ्यावा. डिजिटल युगात मोबाईल पाहण्यासाठी जेवढा वेळ घालवला जातो त्यापेक्षा कमी वेळात पुस्तकाची किमान चार पाने वाचण्यासाठी वेळ घालवावा, वाचनामुळे आचार, विचार बदलले जातात.डिजिटल युगातील मोबाईल संस्कृतीमुळे अनेकांचे वाचनाकडे दुर्लक्ष झालेले आहे.” याचे उदाहरणासह गोसावी यांनी दाखले दिले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “आज वाचन संस्कृतीवर व्याख्यान आयोजित केले होते, या व्याख्यानातून वाचन किती गरजेचे आहे हे गोसावी यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. सोशल मीडियावर येणारे मेसेज व माहिती सगळीच खरी असते असे नाही. बहुतांशी माहिती अर्धवट स्वरूपात असते, अनेक लोक तीच माहिती घेऊन इतरांना पाठवितात, परिपूर्ण माहिती नसल्यामुळे अज्ञान वाढते तर वाचनामुळे परिपूर्ण ज्ञान मिळवणे शक्य होते. ज्या अनेक गोष्टी माहिती नसतात त्या वाचनामुळे माहिती होतात. डिजिटल युगापूर्वी प्रत्येक जण वर्तमानपत्र पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचन करीत होते, त्यामध्ये संपादकीय लेख आवर्जून वाचले जात, आता सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अर्धवट बातम्याचा परिणाम सामाजिक जीवनावर होत आहे, सोशल मीडियाची बातमी पाहिल्यानंतरही बातमी वाचल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यामुळे वाचन काळाची गरज आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.”
यावेळी अधीक्षक सुदर्शन जवक, ग्रंथपाल संभाजी वाळके, संतोष गाडेकर, मनोजकुमार पापडीवाल, कपिल भावसार, सुरेश चासकर, दिनकर पवार, भारत साळुंखे, सुदाम कडू,भास्कर जाधव,ज्ञानेश्वर सरोदे, कृष्णा महाकाळ, विजय साठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी तर आभार प्रदर्शन अमोल दातीर यांनी केले.