🔸निंभी येथील टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरन्याचा दिला इशारा
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अमरावती(दि.18जुलै):-मोर्शी वरूड महामार्गावरील निंभी येथील टोल नाका रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. निंभी येथील टोल नाक्याच्या काम जलद गतीने सुरू असून या टोल नाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वसुली केली जाणार असून या विरोधात मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नरेंद्र जिचकार, रुपेश वाळके, अंकुश घारड डॉ प्रदीप कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात निंभी येथील टोल नाका रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धडक देऊन यासंदर्भात तत्काळ बैठक आयोजित करून टोल नका रद्द करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा देण्यात आला.
मोर्शी वरूड तालुक्यातील लाखो नागरिक या टोलनाक्याने प्रभावित होणार आहेत. वरूड मोर्शी तालुक्यातील व्यावसायिक, शेतकरी वाहनाने ये-जा करतात तसेच शेतमाल ने आण करतात, नांदगाव व अमरावती येथे एमआयडीसी व इंडिया बुल्स प्रकल्प आहे. तसेच अमरावती येथे विविध मॉल व दुकानांमध्ये बहुतांश कामगार, उद्योजक अपडाऊन करतात. मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळ व भाजीपाला वाहनांद्वारे अमरावतीला ने आण केला जातो. या टोलनाक्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा खर्ची पडणार असून शेतकरी, व्यावसायिक वापरासाठी वाहनांना या टोलचा भार सहन करावा लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निंभी येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नियमाप्रमाणे ७० किलो मीटरपर्यंत रस्ता व्यवस्थित असेल तरच टोल आकारता येतो. या महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असल्यामुळे निंभी येथील टोल नाका रद्द करून वरूड मोर्शी तालुक्यातील वाहन धारकांना दिलासा देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, मोहन मडघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, सदातपुरे, उदय तायडे, नंदकिशोर पवाडे, विलास ठाकरे, अमोल सोलव, रोशन राऊत, नितेश गिद, यांच्यातर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.
चौकट —
या महामार्गाने हजारो शेतकरी कामगार दररोज दोन चार वेळा ये-जा करतात. हा टोल नाका शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरनारा असून निंभी येथील टोल नाका आम्हाला मान्य नाही. तो झाला तर सर्वांची मोट बांधून तीव्र आंदोलन छेडू. — अंकुश घारड शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली होती की राष्ट्रीय महामार्गांवर आता 60 किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असणार. जर दुसरा टोल आढळला तर तो टोल बंद करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली होती. तरीही अमरावती मोर्शी वरूड पांढूर्णा महामार्गावर ३० किमी अंतरावर निंभी येथील टोल नक्याला परवानगी मिळाली कशी हा संशोधनाचा विषय आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.