✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.14जुलै):- जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो जगभर लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची या दिवशी जाणीव करून दिली जाते.
आपल्या पृथ्वीची निर्मिती 453 कोटी वर्षापूर्वी झालेली असून पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी 71 टक्के व जमीन 29 टक्के ने व्यापलेला आहे. सन 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास विषयक कार्यक्रम (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जावा अशी शिफारस केली. तेव्हापासून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्रा. एस .एम. पांढरपट्टे सर यांनी केले. ते राष्ट्रीय सेवा योजना(N.S.S) च्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
त्यांनी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे सांगितली .त्यामध्ये मुले आणि मुलींचे तरुणाईचे समान संरक्षण करणे व त्यांचे सक्षमीकरण करणे ,समाजातून लिंगनिहाय तेच ते दृष्टिकोन हद्दपार करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे, मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी फायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे. तसेच लोकसंख्या वाढीचा जगावर होणारा परिणाम सांगितला त्यामध्ये अन्नधान्याचा तुटवडा ,अपुरा निवारा ,दळणवळण, शैक्षणिक ,आरोग्यविषयक यांचा अभाव ,जंगलतोड, स्थलांतर ,साधन संपत्ती व ऊर्जेची कमतरता भासणे, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण याचा समाजावर होणारा परिणाम त्यांनी स्पष्ट करून सांगितले.
तसेच कॉलेजच्या उपप्राचार्य मा.श्री.आर. ए .कांबळे सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लोकसंख्येचे फायदे व तोटे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री .एस .पी. पवार मॅडम यांनी करून दिला. श्री . एन .बी.पाटील सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.